'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 10:41 AM2020-04-26T10:41:18+5:302020-04-26T11:51:09+5:30

ज्येष्ठ साहित्यिक, 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे रविवारी सकाळी पुण्यातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.

Uttam Bandu Tupe passes away | 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे निधन

'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे निधन

Next

पुणे : समाजातील जळजळीत वास्तव, अनुभवांची दाहकता आयुष्यभर लेखणीवाटे साहित्यात उतरवणारे ज्येष्ठ साहित्यिक, 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे रविवारी सकाळी पुण्यातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षाघाताने आजारी होते. त्यांची पत्नी जिजा यांचे काही महिन्यांपूर्वी पक्षाघाताने निधन झाले. उत्तम तुपे यांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे दोन मुले असा परिवार आहे.

उत्तम बंडू तुपे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होतीच; पण उतारवयातील त्यांना आणि पत्नीला पक्षघात झाल्याने अडचणींमध्ये आणखीच भर पडली होती. मागील वर्षी प्रसारमध्यमांनी त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे वास्तव समोर आणल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून त्यांना पाच लाखांची मदत करण्यात आली होती.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एका छोट्या  खेड्यात तुपे यांचा जन्म झाला. दुष्काळी परिस्थितीमुळे ते सताऱ्यातून पुण्यात स्थलांतरित झाले. त्यांनी आपल्या बहिणीचा आधार घेतला. पुढे त्यांना वामनराव देशपांडे भेटले. तेथे त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वाचले. तो प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांच्यामधले लेखन बीज अंकुरले. आपल्या आत्याच्या आश्रयाने ते पुण्यात कसेबसे जगले. पडेल ती कामे पत्करली.  मोलमजुरी करून दिवस काढले. तुपे यांना योगायोगाने जिवाभावाची मानलेली मीनाताई बहीण भेटली. अल्पशिक्षित असूनही उत्तम बंडू तुपे यांनी मराठीमध्ये विपुल लेखन केले. कादंबरी, लघुकथा, नाटक आणि आत्मकथन या प्रकारांत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. उपेक्षित, वंचित समाजाच्या वेदना-व्यथा त्यांच्या साहित्यातून चित्रित झाल्या. 

साहित्य अकादमीपासून अनेक पुरस्करांचे मानकरी ठरलेल्या उत्तम तुपे यांची राज्य सरकाराने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य म्हणून देखील निवड केली. कादंबरी, कथा, नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील तब्बल 52 पुस्तके उत्तम तुपेंच्या नावावर आहेत. झुलवा, भस्म, आंदण, पिंड, माती आणि माणसं, काट्यावरची पोटं, लांबलेल्या सावल्या, शेवंती ही त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांपैकी काही नावं. झुलवा ही जोगतिणींच्या आयुष्यावरील कांदबरी लिहिण्यासाठी ते स्वतः वेष बदलून जोगतीण बनले आणि जोगतिणींच्या वाट्याला येणारे अनुभव त्यांनी कागदावर उतरवले. 'भस्म' या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा तर 'काट्यावरची पोटं' या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य सरकारचा साहित्य सर्वोत्कृष्ट आत्मचरित्रासाठीचा पुरस्कार मिळाला. तिसरीपर्यंत शिकलेल्या तुपे यांनी लिहिलेली पुस्तके विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवडली गेली.

Web Title: Uttam Bandu Tupe passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.