खंडाळ्याच्या कुशीतील वाघजाई
By Admin | Published: October 6, 2016 02:40 AM2016-10-06T02:40:08+5:302016-10-06T02:40:08+5:30
मुंबई-पुणे प्रवासात बोरघाटातून सह्याद्रीच्या रांगा पार करत लोणावळ्याच्या दिशेने जाताना निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या खंडाळा
लोणावळा : मुंबई-पुणे प्रवासात बोरघाटातून सह्याद्रीच्या रांगा पार करत लोणावळ्याच्या दिशेने जाताना निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या खंडाळा गावाच्या घाटमाथ्यावर श्री वाघजाईदेवीचे स्वयंभू व जागृत देवस्थान व देवालय आहे.
वाघजाई मातेच्या देवालयास ब्रिटिशकाळापासून महत्त्व प्राप्त आहे. त्या काळी घनदाट अरण्य, खोल दऱ्या, हिंस्र श्वापदे असलेल्या या भागातून प्रवास करणे म्हणजे धाडसच असायचे. परंतु दळणवळणाचा हाच मार्ग असल्याने प्रवास सुखरूप होण्यासाठी आपली उद्दिष्टे सफल होण्यासाठी व्यापारी, सैनिक आणि नागरिक आई वाघजईला साकडे घालून प्रार्थना करून या भागातून प्रवास करीत असत.
देवस्थानाची १८६७मध्ये डागडुजी करून देवीला छत्रछाया देऊन मंदिराची उभारणी करण्यात आली. दिवाबत्तीची सोय करण्यासाठी प्रमुख पुजारी म्हणून सख्या हरी कोळी यांची त्या काळी नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर आबू गणू लांघे, त्यांची मुले नारायण, बबन, कोंडीराम यांनी पुजारी म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. सध्या लांघे कुटुंबीयच पुजाऱ्याचे काम पाहतात. भाविक दर्शन, नवस, साकडे, कौल आदीसाठी येत असतात. मंगळवार व शुक्रवार या देवीच्या दोन्ही वारी भाविकांची गर्दी असते.
मंदिर परिसरातील वनराई व निसर्गरम्य परिसर भाविकांच्या मनाला सुखानुभव देऊन जातो. लोणावळ्याचे माजी नगरसेवक (कै.) एम. डी. कचरे पाटील यांनी १९७८मध्ये कार्यकारी मंडळाची स्थापना केली. मंदिराची देखरेख, भाविकांसाठी धर्मशाळा, विद्युतीकरण, पिण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. सन १९८१मध्ये या ठिकाणी श्री वाघजई देवी मंदिर ट्रस्टची स्थापना केली. (वार्ताहर)