वारकरी विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाबाचा त्रास
By admin | Published: November 21, 2014 04:01 AM2014-11-21T04:01:56+5:302014-11-21T04:01:56+5:30
शेंगदाणे समजून एरंडाच्या बिया खाल्ल्याने वारकरी शिक्षण घेणाऱ्या १२
पिंपरी : शेंगदाणे समजून एरंडाच्या बिया खाल्ल्याने वारकरी शिक्षण घेणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना उलट्या व जुलाबाचा त्रास झाला.
ही घटना बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तळेगाव-चाकण रस्त्यावरील इंदोरीजवळील भंडारा डोंगर येथे घडली.
दत्ता गुरसुले (वय १४), ऋषीकेश शेखर सोलर (१३), जानकू खैरमोडे (१७), चैतन्य मुजाराम इंगळे (१०), हरिओम कांबळे (१०), कृष्णा बाबासाहेब कथाळे (१२), आनंद शंकर सोलार (१०), ज्ञानेश्वर पांगरे (११), अर्जुन सोमनाथ ढोले (११),
उमेश राधाकृष्ण शिंदे (१०), ज्ञानेश्वर बाबूराव पितळे (१०), अनिल बलावर (१४, सर्व रा. ज्ञानवैष्णव वारकरी शिक्षण संस्था, दादेगाव, पैठण, औरंगाबाद) अशी त्रास झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
ज्ञानवैष्णव वारकरी शिक्षण संस्थेतील ३० ते ३५ जण कार्तिक वारीसाठी १६ नोव्हेंबरला आळंदीला आले होते. बुधवारी सायंकाळी साडेचारला हे सर्व वारकरी आळंदीहून भंडारा डोंगरावर दर्शनासाठी आले होते. येथील दर्शन घेऊन निघाले असताना संस्थेतील दहा ते बारा विद्यार्थ्यांनी शेंगदाणे समजून एरंड बिया खाल्ल्या. त्यामुळे त्यांना मळमळणे, उलट्या, जुलाब होण्याचा त्रास होऊ लागला. उपचारासाठी या सर्व मुलांना सायंकाळी सातच्या सुमारास चाकण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर रात्री साडेअकराला त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंगळे, कांबळे, कथाळ, सोलार, पांगरे, ढोले, शिंदे व पितळे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना गुरुवारी सकाळी रुग्णालयातून सोडण्यात आले. तर गुरमुले, सोलार, खैरमोडे आणि बलावर यांना गुरुवारी दुपारी रुग्णालयातून सोडण्यात आले. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)