पुणेकरांना शिकवू पाही, असा भूमंडळी कोण आहे? ५० टक्के मतदान; तरीही आम्हाला दोष देऊ नका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 06:15 AM2019-04-25T06:15:14+5:302019-04-25T06:15:47+5:30
‘सोशल मीडिया’त पुणेकर चेष्टेचा विषय
पुणे : पुणे मतदारसंघात ४९.८४ टक्केच मतदान झाल्याने ‘सोशल मीडिया’त पुणेकर चेष्टेचा विषय झाले आहेत, पण मतदानाचा अधिकार ऐच्छिक असून, ‘आम्ही राज्यघटनेच्या अधिन राहून स्वातंत्र्य उपभोगले आहे,’ अशी प्रतिक्रिया पुणेकर व्यक्त करीत आहेत. टीकेला प्रत्युत्तर न देता, अनुल्लेखाने मारण्याची ‘पुणेरी’ पद्धतही पुणेकरांनी कायम राखली आहे.
राज्यघटनेचे तज्ज्ञ उल्हास बापट यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, एखाद्या ठिकाणची लोकशाही प्रगल्भ आहे की नाही, हे ठरविण्याच्या मापदंड मतदानाची टक्केवारी हा असू शकत नाही. अमेरिका, आॅस्ट्रेलिया, तसेच युरोपातल्या काही देशांमध्ये मतदानाची टक्केवारी ५० पेक्षा कमी असते. काही देशांमध्ये मतदान न केल्यास आर्थिक दंडाची तरतूद आहे. तेथील लोक दंड भरतात, पण मतदान करीत नाहीत.
मतदान न करणारे लोकप्रतिनिधींबद्दल बोलण्याचा हक्क गमावून बसतात का, या प्रश्नावर बापट म्हणाले की, अजिबातच नाही. घटनेतील १९व्या कलमांतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायमच राहते.
मतदान कमी झाल्याने आभाळ कोसळले, असे मानण्याचे कारण नाही. मतदारांना उत्साह वाटावे, अशी वातावरण निर्मिती राजकीय पक्ष करू शकले नाहीत, तरीही ५० टक्के पुणेकर स्वत:हून मतदानाला बाहेर पडले, ही चांगली बाब आहे, असे राजकीय नेते अंकुश काकडे म्हणाले. येथील पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई म्हणाले की, पुणेकरांचे मतदान कमी झाले, ही वस्तुस्थिती आहे. अधिक मतदान झाले असते, तर मला ते आवडले असते, पण मतदान कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यावरून पुणेकरांना कोणी आव्हान देऊ शकत नाही. पुणेकरांचे कर्तृत्व अबाधित आहे.
व्यंगचित्रकार चारुहास पंडित म्हणाले की, मतदान कमी झाले, हे खरे असले तरी नेमके उत्तर शोधायला हवे. मतदान न करणाऱ्यांमध्ये अस्सल पुणेकर किती आणि बाहेरून पुण्यात स्थायिक झालेले किती, याबाबत नेमका अंदाज येणे अवघड आहे. पुण्यात अस्सल पुणेकरांचा टक्का घसरल्याने मतदानाचाही टक्का घसरला आहे. सन १९६७ मध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. त्या वर्षी झालेले ६९.६४ टक्के मतदान हे पुण्यातले आजवरचे सर्वोच्च होय. तर पुण्याच्या इतिहासातील सर्वांत कमी मतदान २००९ मध्ये ४०.६६ इतके झाले. त्या वर्षी काँग्रेसचे सुरेश कलमाडी विजयी झाले. दरम्यान, गेल्या पाच लोकसभा निवडणुकांमध्ये पुण्यातल्या मतदानाची टक्केवारी ५५ च्या पुढे गेलेली नाही.
सोशल मीडियातली शेलकी शेरेबाजी
पुणे मतदानात उणे
पुणेकरांनी इतरांना शहाणपणा शिकवणाच्या जन्मजात हक्काबाबत शंका निर्माण केल्या आहेत
पुणेकर १ ते ४ झोपले की काय?
पुस्तक दिनी पुणेकर वाचनात इतके रमले की मतदान करायला विसरले
ज्यांना स्वत:चे मत असते, तेच देतात
पुण्यातील मतदान अंदाजे ४९ टक्के, इतरांना अक्कल शिकवायचे प्रमाण