पुण्यात बेकायदेशीरपणे घरात घुसून तोडफोड करणा-या महिलेची शिक्षा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 04:36 PM2017-10-09T16:36:59+5:302017-10-09T16:37:01+5:30
पुणे : बेकायदेशीरपणे घरात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी महिलेला प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी सुनावलेली साडेचार हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम. एन. सलीम यांनी हा आदेश दिला आहे.
माधुरी सबनीस (वय ४०, रा. धनकवडी) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत संदीप नगरसकर (रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २ नोव्हेंबर २०११ रोजी दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी धनकवडी परिसरात घडली होती. माधुरी सबनीस या अनधिकृतपणे फिर्यादीच्या घरात घुसल्या. त्यानंतर त्यांनी घरातील सामानाची मोडतोड करून जवळपास ३ हजार रुपयांचे नुकसान केले होते. दरम्यान, याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी १३ नोव्हेंबर २०१४ रोजी सबनीस यांना दोषी ठरवत साडेचार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात माधुरी सबनीस यांनी सत्र न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला होता. या अर्जवर सुनावणी करताना सत्र न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी सुनावलेली शिक्षा कायम ठेवली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले.