वेल्ह्यात महिला केसरी कुस्ती स्पर्धा, खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 02:55 AM2018-01-30T02:55:16+5:302018-01-30T02:55:34+5:30
महाराष्ट्रात प्रथमच महिला केसरी स्पर्धा वेल्ह्यात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष राहुल काळभोर यांनी दिली. वेल्हे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेच्या अगोदर सर्वांनी मैदानाची पाहणी केली व स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला.
मार्गासनी : महाराष्ट्रात प्रथमच महिला केसरी स्पर्धा वेल्ह्यात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष राहुल काळभोर यांनी दिली. वेल्हे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेच्या अगोदर सर्वांनी मैदानाची पाहणी केली व स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला.
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच महिलांच्या राज्यस्तरीय कुस्तीस्पर्धा वेल्ह्यात घेणार असून, यासाठी प्रथम क्रमांकासाठी चांदीची गदा व रोख रक्कम राजमाता जिजाऊ यांच्या नावाने, तर व द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे, तर मल्लसम्राट महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील विजेत्यासाठी ८४ ते १२० वजनगटासाठी प्रथम क्रमांक जीप गाडी व गदा आणि द्वितीय क्रमांक बुलेट, तसेच ८६,७४,७०,६५, ६१,५७ या वजनगटासाठी प्रथम क्रमांकाला दुचाकी, तर द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम, अशी बक्षिसे असणार आहेत. कुमार गटासाठी होणाºया स्पर्धेतील प्रत्येक विजेत्या स्पर्धकास रोख रक्कम वेल्हे पंचायत समितीचे माजी सदस्य संतोषआप्पा दसवडकर हे देणार आहेत. वेल्हे तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव राजाराम कदम म्हणाले की, या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १० एकरवर पार्किंग सोय करण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेसाठी आंतराराष्ट्रीय व राज्यस्तरीय पंचांच्या नेमणुका केल्या आहेत. वेल्हे येथे आयोजित स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष राहुल काळभोर, सचिव प्रदीप भोसले, मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचे कोच ज्ञानेश्वर मांगडे, वेल्हे तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शंकर भुरुक, सचिव राजाराम कदम, वेल्हे पंचायत समितीचे माजी सदस्य संतोषआप्पा दसवडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, कुलदीप कोंडे, वेल्ह्याचे माजी सरपंच संतोष मोरे, माजी उपसरपंच सुनील राजीवडे, सुनील कोळपे, विलास पांगारे, मंगेश पवार, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वयंभू मेंगाईदेवी स्टेडियम
महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सचिव प्रदीप भोसले म्हणाले की, महाराष्ट्रात कुस्ती वाढावी या उद्देशाने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित केली असून, याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्ला घेऊन केली होती, त्याचप्रमाणे आम्हीदेखील वेल्ह्यातून करीत आहोत.
मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचे प्रशिक्षक ज्ञानेश्वर मांगडे म्हणाले, की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या मॅटवर होतात, त्यासाठी गावोगावी मॅटवर मल्लांनी कुस्त्यांचा सराव करावा, या उद्देशाने ही मॅटवर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात येत आहे.
वेल्हे कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शंकरनाना भुरुक म्हणाले की, राज्यस्तरीय मॅटवरील कुस्तीस्पर्धेसाठी स्टेडियम छत्रपती शिवाजी स्वयंभू मेंगाई देवी स्टेडियम हे नाव देण्यात आले आहे. या स्टेडियममध्ये विविध गॅलरी आहेत. यामध्ये स्वर्गीय मामासाहेब मोहोळ, तोरणा राजगड अशी ऐतिहासिक नावे दिली आहेत.
वेल्हे (ता. वेल्हे) राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी मैदानाची तयारी सुरु असून, या मैदानाची पाहणी करताना महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष राहुल काळभोर, सचिव प्रदीप भोसले, ज्ञानेश्वर मांगडे, शंकर भुरुक, राजाराम कदम आदींसह मान्यवर.