मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी तरुणांचा 'हेल्पिंग हॅन्ड'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 05:33 PM2018-12-13T17:33:58+5:302018-12-13T17:46:08+5:30
मराठवाड्यातून पुण्यात शिक्षणासाठी अालेल्या विद्यार्थ्यांना सध्य अनेक अडचणींचा सामना करावा लागत अाहे. त्यांच्या मदतीला अाता हेल्पिंग हॅन्ड ही संस्था पुढे अाली अाहे.
- राहुल गायकवाड
पुणे : शिक्षणासाठी महाराष्ट्रातील विविध भागांमधून लाखाे विद्यार्थी पुण्यात येत असतात. यातही मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची संख्या एकूण विद्यार्थ्यांच्या 40 टक्केहून अधिक अाहे. एकीकडे मराठवाड्यात भीषण दुष्काळ असताना पुण्यात शिक्षणासाठी पाठवलेल्या मुलांना पैसे पाठविणे त्यांच्या पालकांसाठी अवघड झाले अाहे. परिणामी पुण्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अर्धपाेटीच रहावे लागत अाहे. अशा विद्यार्थ्यांच्या मदतीला अाता दुष्काळी भागातले तरुणच पुढे अाले अाहेत. या तरुणांनी हेल्पिंग हॅन्ड ही संस्था सुरु केली असून या माध्यमातून मुलांच्या मेससाठी स्पाॅन्सर मिळविण्याचा काम करण्यात येत अाहे.
2015 नंतर पुन्हा एकदा माेठा दुष्काळ मराठवाड्यात पाहायला मिळत अाहे. पाऊसच पडला नसल्याने पिकं करपून गेली. घाेटभर पाण्यासाठी कित्येक किलाेमीटर वणवण भटकावे लागत अाहे. मराठवाड्यात शिक्षणाच्या, राेजगाराच्या संधी नसल्याने तरुणांची पाऊले पुण्याकडे वळतात. सध्या मराठवाड्यातील विद्यार्थी संख्या ही पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संख्येच्या 40 टक्के इतकी अाहे. निसर्गाने दाखवलेली अवकृपा अाणि गरिबी यांमुळे मराठवाड्यात भीषण परिस्थिती अाहे. अापण जे साेसलं ते अापल्या मुलांना साेसावं लागू नये, त्यांनी शिकून अधिकारी व्हावं या अाशेने अनेक पालक अापल्या मुलांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवत असतात. परंतु पुण्यात अाल्यानंतरही या विद्यार्थ्यांच्या मागचा संघर्ष संपत नाही. मेससाठी पैसे नसल्याने सध्या मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना अर्धपाेटी रहावं लागत अाहे. त्यातच पुण्यासारख्या शहरात राहताना खर्च वाढत असल्याने या विद्यार्थ्यांच्या समाेर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला अाहे.
यातच स्वतः दुष्काळाच्या झळा साेसलेला अाणि मराठवाड्यातून शिक्षणासाठी पुण्यात अालेल्या कुलदीप अांबेकर या तरुणाने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी हेल्पिंग हॅन्ड ही संस्था नुकताच सुरु केली अाहे. या संस्थेच्या माध्यमातून स्पाॅन्सर्स शाेधून या विद्यार्थ्यांच्या मेसचा खर्च भागविण्यात येत अाहे. 2015 पासून कुलदीप मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर अावाज उठवत अाहे. त्याला मराठवाडा अाणि दुष्काळी भागातील असलेल्या इतर तरुणांची साथ मिळाली. संध्या साेनवणे, ईश्वर तांबे, दयानंद शिंदे, लक्ष्मण जगताप, रचना परदेशी हे तरुण कुलदीप साेबत इकत्र येत मराठवाड्यातील तरुणांच्या मदतीला धावून अाले अाहेत. नुकताच या तरुणांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थी परिषद भरवली हाेती. या परिषदेत मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांनी अापल्या व्यथा मांडल्या.
कुलदीप म्हणाला, मी स्वतः मराठवाड्यातील अाहे. 2015 साली माझ्याकडे विद्यापीठाचे परीक्षा फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे मला लेट फी भरावी लागली. दुष्काळग्रस्तांची फी माफ करण्यात येेईल असे सरकारने जाहीर केले हाेते, प्रत्यक्षात तशी कृती हाेत नव्हती. या विराेधात मी अावाज उठवला. पाहता पाहता मला हजाराे विद्यार्थ्यांची साथ मिळाली. अाम्ही विद्यापीठात माेर्चा काढून 5 काेटी रुपयांचे शुल्क माफ करण्यास विद्यापीठाला भाग पाडले. येथूनच या चळवळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. अाम्ही सुरुवातीला काही स्पाॅन्सर्सच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे मेसचे पैसे भरले. या चळवळीला व्यापक स्वरुप देण्यासाठी अाम्ही हेल्पिंग हॅन्ड संस्थेची स्थापना केली. सध्या अाम्ही शेकडाे विद्यार्थ्यांना मदत करत अाहाेत. अाम्हाला अाता मदतीचा अाेघ देखिल वाढताेय.
संध्या म्हणाली, मी सुद्धा दुष्काळी भागातून पुण्यात शिक्षणासाठी अाले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करताना मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या करुण कहाण्या कानावर पडल्या. अापल्या बांधवांसाठी काहीतरी केले पाहिजे असा विचार सुरु असताना कुलदीप करत असलेल्या कार्याची माहिती मिळाली. या सामाजिक कार्यात अाम्ही एकत्र काम करण्यास सुरुवात केली. मराठवाड्यात यंदा देखिल भीषण दुष्काळ अाहे. पुण्यात शिक्षणासाठी अालेल्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल हाेत अाहेत. अक्षरक्षः वडापाववर अनेक विद्यार्थी दिवस काढत अाहेत. मराठावाड्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक हे शेती करतात. पिके करपल्याने यंदा उत्पादन झाले नाही. त्यामुळे पालक पुण्यात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पैसे पाठवू शकत नाहीत. पुण्यात राहताना या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत अाहे. हेल्पिंग हॅन्डच्या माध्यमातून अाम्ही या विद्यार्थ्यांचं थाेडसं का हाेईना अाेझं कमी करण्याचा प्रयत्न करत अाहाेत.
मराठवाड्यातील या विद्यार्थ्यांना नागरीकांनी मदत करावी असे अावाहन हेल्पिंग हॅन्डच्या वतीने करण्यात अाले अाहे.