पुणे जिल्ह्यात झीरो पेंडन्सी प्रभावी : चंद्रकांत दळवी; महसूल विभागाच्या कामाचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:09 PM2017-12-23T12:09:09+5:302017-12-23T12:17:12+5:30
दळवी यांनी जिल्ह्यातील झीरो पेंडन्सीच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, नीलिमा धायगुडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे उपजिल्हाधिकारी, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.
पुणे : पुणे जिल्ह्यात महसूल विभागाने राबविलेल्या झीरो पेंडन्सीमध्ये प्रभावी काम झाले असून त्यामुळे काम घेऊन कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे. लोकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केली.
दळवी यांनी जिल्ह्यातील झीरो पेंडन्सीच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, समन्वयक उपजिल्हाधिकारी नीलिमा धायगुडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे उपजिल्हाधिकारी, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.
दळवी म्हणाले, ‘झीरो पेंडन्सीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे कामाचा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. सर्वसामान्यांची कामे वेळेत पूर्ण होतील. प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. येत्या डिसेंबरअखेर जिल्ह्यातील महसूल विभागात झीरो पेंडन्सी होणार आहे. हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असला तरी डेली डिस्पोजलचे कामही वेगाने आणि सातत्याने होणे आवश्यक आहे.
या कामात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. सामान्य लोकांनाही शासनाच्या आणि प्रशासनाच्या प्रती आदर निर्माण होणार आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे दळवी म्हणाले. यावेळी बैठकीत उपस्थित अधिकाºयांनी विविध शंकांचे निरसरण करून घेतले़
‘कोसला’कार भालचंद्र नेमाडेंनी मानले आभार
ज्ञानपीठ पुरस्कारविजेते, कोसलाकार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या पुण्यातील फ्लॅटच्या नोंदणीचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. झीरो पेंडन्सी अभियानामुळे हे काम अत्यंत कमी वेळेत झाले. प्रशासनात झालेल्या सकारात्मक बदलामुळे प्रभावित झालेले नेमाडे यांनी एक पत्र लिहून विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे आभार मानून झीरो पेंडन्सी अभियानाचे कौतुक केले.