जिल्ह्यातील हाणामारीत १४ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 03:19 AM2017-10-22T03:19:54+5:302017-10-22T03:19:57+5:30
दिवाळी म्हणजे जुने वैर विसरून, नवे स्नेहबंध निर्माण करण्याचा सण; परंतु या दिवाळी सणाच्या काळातच जिल्ह्यात अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
अलिबाग : दिवाळी म्हणजे जुने वैर विसरून, नवे स्नेहबंध निर्माण करण्याचा सण; परंतु या दिवाळी सणाच्या काळातच जिल्ह्यात अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाप या गावात पूर्ववैमनस्याचा राग मनात धरून गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे दुचाकीवरून जात असताना पाच आरोपींनी झाप गावातील रस्त्यावर आडवून हाताबुक्क्याने मारहाण केली. फिर्यादी यांच्या आईलादेखील धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी पाली पोलिसांनी विविध कलमान्वये रीतसर गुन्हा दाखल केला आहे. विरोधी गटाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माथेरान येथे घोडे विक्रीची भागीदारी फिर्यादी यांनी तोडली. या गोष्टीचा मनात राग धरून गुरुवारी संध्याकाळी दोघांनी फिर्यादी यांचा रस्ता अडवून शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादीला मारण्याची धमकी देऊन घोड्यांना दगड मारून दुखापत केली. माथेरान पोलिसांनी प्राण्यास निर्दयतेने वागविल्याप्रकरणी दोघा आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
>पाण्यावरून धक्काबुक्की
कोपरी (खालापूर) येथील फिर्यादी व आरोपी हे दोघेही एकमेकांचे शेजारी असून अंगणात आलेले नळाचे पाणी झाडूने काढीत असताना आरोपी यांनी तेथे येऊन अंगणात पाणी का उडवता, असा प्रश्न केला. या गोष्टीवरून त्यांच्यात वाद होऊन आरोपीने फिर्यादीला लाकडी फाट्याने मारहाण करून अन्य एकास शिवीगाळी व धक्काबुक्की केली.