वर्षपूर्तीनंतरही पनवेलकरांचे प्रश्न जैसे थे! घनकच-यासह आरोग्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 05:21 AM2017-10-01T05:21:57+5:302017-10-01T05:22:02+5:30

पनवेल महापालिकेची १ आॅक्टोबरला वर्षपूर्ती. एक वर्षाच्या कालावधीमध्ये निवडणुकांचे सोपस्कार पार पाडण्याव्यतिरिक्त ठोस काहीही साध्य करता आलेले नाही. घनकच-यासह आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

After the year, Panvelkar's questions were like! Solid-related health issues are serious | वर्षपूर्तीनंतरही पनवेलकरांचे प्रश्न जैसे थे! घनकच-यासह आरोग्याचा प्रश्न गंभीर

वर्षपूर्तीनंतरही पनवेलकरांचे प्रश्न जैसे थे! घनकच-यासह आरोग्याचा प्रश्न गंभीर

Next

- वैभव गायकर ।

पनवेल : पनवेल महापालिकेची १ आॅक्टोबरला वर्षपूर्ती. एक वर्षाच्या कालावधीमध्ये निवडणुकांचे सोपस्कार पार पाडण्याव्यतिरिक्त ठोस काहीही साध्य करता आलेले नाही. घनकच-यासह आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करून प्रशासनाने प्रसिद्धी मिळविली असली, तरी दर्जेदार नागरी सुविधा पुरविण्यामध्ये मात्र अपयश आले आहे. विकासाची गती वाढविली नाही, तर नागरिकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिडको, नगरपालिका, एमआयडीसी व ग्रामपंचायतीमध्ये विभागलेल्या पनवेल तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी शासनाने १ आॅक्टोबर २०१६ रोजी महापालिकेची घोषणा केली. महापालिकेमुळे विकासाला गती मिळेल व दर्जेदार नागरी सुविधा मिळतील, अशी अपेक्षा नागरिकांना वाटू लागली होती. आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पदभार स्वीकारताच मनपा क्षेत्रामधील अनधिकृत फेरीवाल्यांवर व अतिक्रमणांवर कारवाईला सुरुवात केली. प्रशासनाच्या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा निर्माण झाली; परंतु प्रशासनाच्या कामाचा धडाका फेरीवाले हटविण्यापुरताच मर्यादित राहिला. अतिक्रमणे वगळता इतर नागरी सुविधांकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. यामुळे आयुक्तांच्या कामाचा करिश्माही कमी होत गेला. एका वर्षाच्या कालावधीमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यात शासन व प्रशासनाला यश आले. भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महापौर व उपमहापौरांची निवडणूक वेळेत झाली असली तरी स्थायी समितीसह इतर समित्यांची निवड अद्याप झालेली नसल्याने लोकप्रतिनिधींनाही अपेक्षित गतीने काम करता आलेले नाही. महापालिकेची स्थापना होण्यापूर्वी ज्या समस्या होत्या त्याच एका वर्षानंतरही जैसे थे आहेत. यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास होऊ लागला आहे. नागरिकांच्या मनामध्ये पालिकेविषयी नाराजी वाढू लागली असून, नाराजी दूर करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
घनकचरा व्यवस्थापन हा महापालिकेसमोरील गंभीर प्रश्न आहे. शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. जागोजागी कचºयाचे ढीग पाहायला मिळत आहेत. गावठाण परिसरातील स्थिती सर्वात गंभीर आहे. नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधाही अद्याप उपलब्ध करून देता येत नाहीत. नागरी आरोग्य केंद्र, माता बाल रुग्णालय ते प्रमुख रुग्णालयाची यंत्रणा उभी करण्यासाठी ठोस काहीही झालेले नाही. सिडकोकडून नोड हस्तांतरणाला प्राधान्य दिले असले, तरी अत्यावश्यक सेवा हस्तांतर करण्यास विलंब केला जात आहे. पूर्ण महापालिकेसाठी घनकचरा व्यवस्था, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, गटार या सुविधा देण्यासाठी ठोस धोरण आखणे गरजेचे आहे. अग्निशमन यंत्रणा फक्त नावापुरतीच आहे. महापालिका स्थापनेचे पहिले वर्ष असल्याने प्रचंड गैरसोयी होऊनही नागरिकांनी उघड नाराजी व्यक्त केली नाही. अशीच स्थिती राहिली तर मात्र महापालिका व सत्ताधाºयांविरोधातही नागरिक रोडवर उतरण्यास सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एक वर्षामध्ये झालेली कामे
अनधिकृत फेरीवाले हटविण्यामध्ये यश
दुकानदारांचे मार्जिनल स्पेसमधील अतिक्रमण हटविले
अनधिकृत झोपड्यांसह, होर्डिंगवरही कारवाई
महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त करण्यामध्ये यश

एक वर्षामधील महापालिकेचे अपयश
घनकचरा व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणा नाही
आरोग्य यंत्रणा उपलब्ध करून देण्यात अपयश
अग्निशमन यंत्रणेसाठी ठोस उपाययोजना नाही
आपत्कालीन आराखडाही बनविला नाही

स्थापनेपासूनच्या महत्त्वाच्या घटना
१ आॅक्टोबर २०१६ रोजी महापालिकेची स्थापना; महापालिका आयुक्तपदावर डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती.
नोव्हेंबर २०१६ - २३ ग्रामपंचायतींमधील जवळपास ४०० कर्मचाºयांचे पगार रखडले.
१ जानेवारी २०१७ - महापालिका क्षेत्रामध्ये एलबीटी
६ फेब्रुवारी २०१७ - २३ ग्रामपंचायतींमधील कर्मचाºयांचा आंदोलनाचा इशारा.
२१ फेब्रुवारी २०१७ - खारघरमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई करताना आयुक्त शिंदेंशी व्यापाºयांनी हुज्जत घातली.
१६ मार्च २०१७ - आयुक्त सुधाकर शिंदे यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली व राजेंद्र निंबाळकर यांची नियुक्ती.
१९ एप्रिल २०१७ - निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर.
२४ मे २०१७ - पहिल्या निवडणुकीसाठी मतदान.
२६ मे २०१७ - पहिल्या निवडणुकीची मतमोजणी.
३१ मे २०१७ - आयुक्तपदावर डॉ. सुधाकर शिंदे यांची पुन्हा नियुक्ती.
१० जुलै २०१७ - महापौरपदी कविता चौतमोल व उपमहापौरपदी चारुशीला घरत यांची निवड.

पालिकेमार्फत हागणदारीमुक्त मोहीम राबविण्यात आली. कचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. याकरिता पालिका क्षेत्रात कापडी पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणासंदर्भातही महत्त्वाचे पाऊल पालिका उचलणार आहे. पनवेल महापालिकेला एक सक्षम पालिका करण्याचा मानस आहे.
- डॉ. कविता चौतमोल,
महापौर,
पनवेल महापाालिका

पनवेल महापालिका स्वच्छ, सुंदर, स्मार्ट बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. याकरिता विविध उपाययोजना राबवत आहोत. पालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट हा घनकचरा व्यवस्थापन आहे. याकरिता नागरिकांनी घनकचºयाचे आपल्या स्तरावर वर्गीकरण केल्यास, पालिकेला याकरिता येणाºया खर्चात बचत होणार आहे. त्याचा वापर इतर ठिकाणी करता येणार आहे. सध्या अतिशय कमी मनुष्यबळात पालिकेचा कारभार सुरू आहे. पनवेल महानगरपालिकेचा कारभार अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे.
- डॉ. सुधाकर शिंदे,
आयुक्त, पनवेल महापालिका

लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने एकमेकांशी समन्वय साधून काम करावे. पालिका निर्मितीसाठी रहिवाशांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता, पालिकेला अग्रेसर बनविण्यास प्रयत्न केले पाहिजेत. आमदार म्हणून मी नेहमीच सहकार्य देत राहीन.
- प्रशांत ठाकूर,आमदार

घरातून बंगल्यात राहायला गेल्यावर समाधान वाटते. मात्र, पालिकेचा वर्षभराचा कारभार पाहिला असता, बंगल्यापेक्षा घरच चांगले होते, असे वाटायला लागले आहे. पालिकेच्या निर्मितीला कुठे तरी घाई केली असल्याचे दिसून येत आहे. नागरिक लोकप्रतिनिधींना जाब विचारत आहेत. पाणी, कचरा यापैकी कोणताच विषय सुटलेला नसून, वर्षभराचा कारभार नाराज करणाराच आहे.
- प्रीतम म्हात्रे, गटनेता शेकाप

Web Title: After the year, Panvelkar's questions were like! Solid-related health issues are serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.