आंग्रे घराण्याचे कुलदैवत तपोभूमी श्रीक्षेत्र कनकेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:43 AM2017-07-31T00:43:10+5:302017-07-31T00:43:10+5:30

तपोभूमी म्हणून प्रसिद्ध रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे अनेक ऋ षीमुनी व शिवभक्तांनी तपश्चर्या केली असल्याने या शिव देवस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

angarae-gharaanayaacae-kauladaaivata-tapaobhauumai-saraikasaetara-kanakaesavara | आंग्रे घराण्याचे कुलदैवत तपोभूमी श्रीक्षेत्र कनकेश्वर

आंग्रे घराण्याचे कुलदैवत तपोभूमी श्रीक्षेत्र कनकेश्वर

Next

विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग : तपोभूमी म्हणून प्रसिद्ध रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे अनेक ऋ षीमुनी व शिवभक्तांनी तपश्चर्या केली असल्याने या शिव देवस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कनकेश्वरच्या निसर्ग रमणीय देवराईत परमेश्वराचे अस्तित्व असल्याची दृढ श्रद्धा आहे. अत्यंत प्राचीन अशा या कनकेश्वर देवस्थानास पौराणिक पार्श्वभूमी देखील आहे. कनकेश्वर हे एक अतिप्राचीन स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहे. कनकेश्वराचे दर्शन घेतल्याने त्रिभुवनांतील शिवलिंगाचे दर्शन केल्याचे पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. दर श्रावणी सोमवारी भाविकांची येथे मोठी गर्दी असते.
कनकेश्वराच्या दर्शनासाठी जाण्याकरिता पायथ्याच्या मापगाव या गावातून ७५० पायºया चढून जावे लागते. सरखेल राघोजीराजे आंग्रे यांचे तत्कालीन दिवाण गोविंद रेवादास या दानशूर भाविकाने सन १७६४ मध्ये या पायºया व मंदिरासमोरील पुष्करणीचे बांधकाम स्वखर्चाने केले. या ७५० पायºयांमध्ये देवाची एक पायरी आहे. देवाने काम पाहावे, या गोविंद रेवादास त्यांच्या इच्छेनुसार देवाने काम पाहून येथे पावलाचा ठसा उमटवला आहे,अशी आख्यायिका येथे आहे. या पर्वतावर अनेक देवतांची मंदिरे व धर्मशाळा आहेत. कनकेश्वर हे दर्यासारंग आंग्रे घराण्याचे कुलदैवत आहे. पूर्वी देवस्थानची व्यवस्था आंग्रे सरकारकडून होत असे.
मंदिराच्या सभोवतालचा सुमारे १२१ हेक्टर डोंगर व त्यावरील देवराईचे उत्पन्न हे कनकेश्वर देवस्थानकरिता वापरले जात असे. सरकारी दप्तरी हा डोंगर ‘देवाच्या’ नावे नोंदलेला आहे. राघोजी आंग्रे यांनी सवाई माधवराव पेशव्यांकडून इ.स.१७७६ मध्ये पायथ्याशी असलेले सोगाव हे गाव सर्व हक्कांसह देवस्थानला इनाम दिले. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे कार्तिकातील त्रिपुरारी पौर्णिमेला भरणारी कनकेश्वराची यात्रा
असते.
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कनकेश्वराच्या दोन दंतकथा आहेत. या तपोभूमीवर कनकासुर नावाच्या राक्षसाने शिवदर्शनार्थ उग्र तपश्चर्या केल्यामुळे शंकरमहादेवांनी प्रसन्न होऊन त्यास दोन वर दिले. त्यांनी मागितलेल्या वराप्रमाणे कनकासुर व शंकराचे युद्ध झाले. त्यातील त्या राक्षसाचे सामर्थ्य पाहून शंकराने पुन्हा प्रसन्न होऊन राक्षसाला उद्धार होईल असा दुसरा वर मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे कनकासुराने त्याचे व देवाचे दोघांचेही वास्तव्य या डोंगरावर कायमचे राहावे असा वर मागितला. त्यांच्या सिद्धतेकरिता शंकराने राक्षसाला पालथे झोपण्यास सांगून त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्या यज्ञात कनकासुर भस्मसात होऊन त्यास मुक्ती मिळाली. तेव्हापासून या स्थानाला कनकेश्वर हे नाव प्राप्त झाले.

Web Title: angarae-gharaanayaacae-kauladaaivata-tapaobhauumai-saraikasaetara-kanakaesavara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.