उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:09 AM2017-10-06T02:09:22+5:302017-10-06T02:09:35+5:30
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी नसल्याने रक्ताची गरज लागल्यास अन्य मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते.
नेरळ : कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी नसल्याने रक्ताची गरज लागल्यास अन्य मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. रक्ताअभावी छोटी मोठी शस्त्रक्रियासुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळे लवकरच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ब्लड बँकेची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी दिली. कर्जत उपजिल्हा रु ग्णालय भेटीप्रसंगी ते बोलत होते.
आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी गुरु वारी दुपारी कर्जत उपजिल्हा रु ग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांच्या सोबत माजी आमदार देवेंद्र साटम, ठाणे विभागाच्या उपसंचालिका रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई, कर्जत तालुका आरोग्य अधिकारी सी. के. मोरे उपस्थित होते.
देशमुख यांनी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी रुग्णालयात भेडसावणाºया समस्यांचा पाढाच वाचला. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, अपुरा औषध पुरवठा, डिजटल एक्सरे, सोनोग्राफी मशीनची असुविधा, शवगृहाची दुरवस्था, बंद अवस्थेतील उपकेंद्रे अशा अनेक समस्या भाजपाचे किसान मोर्चाचे नेते सुनील गोगटे, तालुका अध्यक्ष दीपक बेहेरे, आरपीआयचे राहुल डाळिंबकर आदींनी मांडल्या. वैद्यकीय आॅफिसरची पदे भरण्यास प्राधान्य देणार असून या पुढे जिल्हाधिकाºयांना सुद्धा याबाबत विशेष अधिकार देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. नुकतेच रायगड आणि पालघर मिळून डॉक्टरांची ८९ पदे भरली असून यापैकी रायगड जिल्ह्यातील ४० डॉक्टरांचा समावेश आहे. तसेच यापुढे रुग्णालयाच्या दर्शनी भागात डॉक्टरांची नावे आणि त्यांच्या वेळा दर्शविण्याचे फलक लावणे बंधनकारक केले जाणार आहे. आवश्यकता भासल्यास बीएएमएस डॉक्टरांचीही भरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.