सीएनजी पंप कमी; त्यात चार तासांतच गॅस संपतोय; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनचालकांचे होताहेत हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 01:48 PM2024-05-13T13:48:35+5:302024-05-13T13:50:54+5:30

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सीएनजीवर चालणारी वाहने खरेदी केली जातात.

cng pump less it runs out of gas within four hours the plight of motorists is happening on the mumbai goa highway | सीएनजी पंप कमी; त्यात चार तासांतच गॅस संपतोय; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनचालकांचे होताहेत हाल

सीएनजी पंप कमी; त्यात चार तासांतच गॅस संपतोय; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनचालकांचे होताहेत हाल

महाड : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सीएनजीवर चालणारी वाहने खरेदी केली जातात. मात्र, सीएनजी पंपांची कमतरता आहे. त्यात मागणीच्या तुलनेत पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने अनेकदा सीएनजी संपला आहे असेच फलक पंपावर लावलेले दिसत असतात. 

मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे कोकणामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आहे. त्याचबरोबर कोकणात सुट्ट्यांसाठी चाकरमानीदेखील येत आहेत. या सर्व वाहनचालकांना मुंबई-गोवा महामार्गावर सीएनजीअभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सीएनजी पंपांवर कधीकधी तासन्तास उभे राहावे लागत आहे. त्यातच सीएनजी संपल्यास रांगेत उभ्या असलेल्या वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गदरम्यान फारच कमी सीएनजी पंप आहेत. 

अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा-

सीएनजी उपलब्ध झाल्याचे समजतात पंपाबाहेर अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. रांगेत असतानाच पंपामधील सीएनजी संपल्यानंतर वाहनचालकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अनेकवेळा वीज खंडित झाल्यास किंवा पंपामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास सीएनजी भरण्यास आलेल्या वाहन चालकांना ताटकळत उभे राहावे लागते.

येथे आहेत पंप-

पनवेल सोडल्यानंतर पेण, रोहा, नागोठणे, माणगाव, इंदापूर आणि पुढे थेट खेडमध्ये सीएनजी पंप उपलब्ध आहे. नुकताच महाड आणि पोलादपूरमध्ये सीएनजी पंप सुरू करण्यात आला आहे. 

फक्त तीन ते चार तासच पंप चालतो-

१) महाडमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या महानगर गॅसच्या पंपामध्ये दिवसाला तीन गाड्या उपलब्ध होतात.

२) यामध्ये साधारण ४०० पासून एक हजार किलोपर्यंत सीएनजी उपलब्ध होतो. 

३) सध्याच्या काळामध्ये मागणी अधिक असून, महानगर गॅसकडून कमी पुरवठा होत असल्याचेदेखील महाडमधील पंपाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. उपलब्ध गॅस हा केवळ तीन ते चार तासांत संपतो.

Web Title: cng pump less it runs out of gas within four hours the plight of motorists is happening on the mumbai goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.