शिक्षण विभागाचे दप्तरच पोलिसांकडे, शिक्षकांच्या बदलीसाठी बोगस सह्या प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 07:04 AM2018-03-06T07:04:19+5:302018-03-06T07:04:19+5:30
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये शिक्षकांच्या बदलीसाठी बोगस सह्या करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाचे दप्तरच पोलिसांकडे सुपूर्द केल्याने संबंधितांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये शिक्षकांच्या बदलीसाठी बोगस सह्या करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाचे दप्तरच पोलिसांकडे सुपूर्द केल्याने संबंधितांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या प्रकरणामध्ये मोठे रॅकेट असल्याने तपास करून भ्रष्टाचाºयांना गजाआड करण्याचे आव्हान अलिबाग पोलिसांपुढे आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील अज्ञात व्यक्तीने खोटी कागदपत्रे तयार करून त्यावर तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या खोट्या सह्या केल्याची बाब समोर आल्यानंतर जिल्हा परिषद हादरली होती. प्रथमदर्शनी २१ शिक्षकांच्या बदलीच्या फायलींवर संशयाची सुई गेल्यानंतर अन्य बदल्यांच्या फायलींवरही तपास यंत्रणेची नजर जाणार असल्याने या प्रकरणातील भ्रष्टाचाराचा खरा आकडा बाहेर येणार आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट असल्याने शिक्षण विभागातील एका कर्मचाºयाने सुमारे ४०० ते ५०० शिक्षकांकडून बदल्यांसाठी प्रत्येकी पंचवीस हजारप्रमाणे एक कोटीचा घोटाळा केला असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केल्यास अनेक मोठी धेंडं यात अडकण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याच्या सूत्रधारामागे राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय हा घोटाळा होणे शक्यच नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासावरच या घोटाळ्याचे भवितव्य अवलंबून आहे. यामधील खरे सूत्रधार पडद्यावर येणार की पडद्यामागेच राहणार याबाबत रायगडमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या प्रकरणाबाबत पोलिसांकडे तक्र ार दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना तपास कामात आवश्यक असणारे सर्व दप्तर देण्यात आल्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी बी.एल. थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पोलिसांकडे अख्खी जंत्रीच सोपवण्यात आल्याने शिक्षकांच्या बदलीच्या फायली कोणाच्या टेबलावरून गेल्या, त्यावर कोणी-कोणी शेरा मारला याची पोलखोल पोलीस तपासात उघड होणार असल्याने संबंधितांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
जिल्हा परिषदेच्या कारभाराचे आॅडिट गरजेचे
अलिबाग येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी रायगड जिल्हा परिषदेचा बोगस सह्यांचा कारभार दोन वर्षांपासून सुरू असल्याचा दावा केला होता. सावंत यांच्या म्हणण्यानुसार खरे तर गेल्या दहा वर्षांमधील रायगड जिल्हा परिषदेच्या कारभाराचे कडक आॅडिट सरकारकडून होणे आवश्यक आहे.
दहा वर्षांत खर्च झालेल्या सरकारच्या प्रत्येक पै अन् पैचा तपास होण्यासाठी जे अधिकारी कार्यरत आहेत, जे बदलून गेले आहेत वा जे निवृत्त झाले आहेत अशा सर्व अधिकाºयांच्या सह्या तपासून त्या त्यांनीच केल्या आहेत का हे तपासणे आवश्यक असल्याचे मत सावंत यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा परिषदेमध्ये कोट्यवधींच्या विकासकामांवर निधी खर्च केला जातो. त्याबाबतच्या निघणाºया बिलांवर होणाºया सह्यांबाबतही आता प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचे बोलले जाते.
पदभार थोरात यांच्याकडे
या विभागाचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे हे अचानक रजेवर गेल्याने त्या विभागाचा पदभार बी.एल. थोरात यांना देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे बडे हे मनमानी कारभार करीत असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता.
त्यानंतर हे प्रकरण बाहेर आल्याने रजेवर गेलेल्या बडे यांना हजर करून घेण्याबाबत पदाधिकारी उत्सुक नसल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
शिक्षण विभागातील या प्रकाराबाबतचा तपास योग्य पध्दतीने सुरू आहे.
- सुरेश वराडे,
पोलीस निरीक्षक
शिक्षण विभागातील एका कर्मचाºयाने सुमारे ४०० ते ५०० शिक्षकांकडून बदल्यांसाठी प्रत्येकी पंचवीस हजारप्रमाणे एक कोटीचा घोटाळा केला असल्याचे बोलले जाते.