जिल्ह्यात वणवे वाढले
By Admin | Published: March 11, 2017 02:21 AM2017-03-11T02:21:52+5:302017-03-11T02:21:52+5:30
रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ठाणे वनपट्ट्यात, ठाणे, डहाणू, शहापूर, जव्हार, अलिबाग व रोहा असे सहा वन विभाग येतात. ठाणे विभागात ५ लाख ०४ हजार
- जयंत धुळप, अलिबाग
रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ठाणे वनपट्ट्यात, ठाणे, डहाणू, शहापूर, जव्हार, अलिबाग व रोहा असे सहा वन विभाग येतात. ठाणे विभागात ५ लाख ०४ हजार ३२५ हेक्टर वनक्षेत्र असून, या तीन जिल्ह्यात गतवर्षभरात ६८८ वणवे लागले आहेत. मात्र, हे वणवे वेळीच विझवण्यात वन विभागास यश आले असल्याची माहिती ठाणे वन
विभागाचे मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
गतवर्षभरात लागलेले हे ६८८ वणवे ४४७३.३१ हेक्टर क्षेत्रावर लागले होते. ठाणे वनपट्ट्यातील जंगले ही ‘शुष्क पानझडी वने’ या प्रकारात मोडतात. यामुळे याठिकाणचे वाळलेला पालापाचोळा तसेच गवत जळते. या वनपट्ट्यात येणाऱ्या रायगड, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यामध्ये भातशेती हे प्रमुख पीक आहे.
सुका पालापाचोळा पेटवून
शेतजमीन भाजण्याची ‘राबभाजणी’ ही पारंपरिक शेती मशागत पद्धती आहे. त्यामुळे देखील जंगलात व त्यालगतच्या भागात राब भाजणीमुळे आग लागण्याची शक्यता असल्याचे लिमये यांनी स्पष्ट केली आहे.
वणव्यांना आळा घालण्याकरिता वन विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येतात. वणवा नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आलेला असून त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येते. १५ फेब्रुवारीपूर्वी जाळरेषा काढण्याची कामे पूर्ण करण्यात आलेली आहे. आग रक्षकांच्या मदतीने वणवा निदर्शनास येताच विझविण्याची कार्यवाही करण्यात येते.
वर्षभरात लागलेल्या
688
वणव्यांपैकी सर्वाधिक १८५ वणवे अलिबाग वन विभागात लागले आहेत. उर्वरित वन विभागात शहापूर वन विभागात १३८, रोहा वन विभागात १२८, ठाणे वन विभागात ११७, डहाणू वन विभागात ९० तर जव्हार वन विभागात ३० वणवे लागले आहेत.
वणव्यांसाठी आधुनिक फायर ब्लोअर
वणवे विझवण्याकरिता आधुनिक फायर ब्लोअर्सचा वापर करण्यात येतो. चालू वर्षात ४२ फायर ब्लोअर वनवणवा विझविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त फायर बिटर आणि फायर रॅक ही उपकरणे देखील देण्यात आली आहेत. सर्व वनपरिक्षेत्र स्तरावर गस्त वाहने उपलब्ध असून त्याचा वणवा नियंत्रणासाठी व गस्तीसाठी प्राधान्याने वापर करण्यात येत आहे.
१५२८ संयुक्त वनव्यवस्थापन समिती
जंगलात लागणारे १०० टक्के वणवे हे मानवनिर्मित असल्याचे निष्पन्न झाले आहे. परिणामी वणव्यांना आळा घालण्याकरिता जनजागृती महत्त्वाची असल्याने ठाणे वनवृत्तात एकूण १५२८ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यांच्यामार्फत जनजागृती करून,वनवणवा नियंत्रणात त्यांचा सहभाग वाढविण्यात येत आहे. गस्ती वाहनांचा वापर करून नागरिकांमध्ये वन वणव्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. संवेदनशील क्षेत्र असणाऱ्या ठिकाणी विशेष गस्त मोहीम राबविण्यात येत आहे.
ठाणे पट्ट्यातील सर्व उप वनसंरक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक फॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडियामध्ये नोंद करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या संदेशानुसार तत्काळ वणवा नियंत्रणासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. ठाणे पट्ट्यातील प्रत्येक वनविभागात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.
टोलफ्री हेल्पलाइन : हॅलो फॉरेस्ट १९२६ ही टोलफ्री हेल्पलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावर प्राप्त वणव्याच्या संदेशांव्दारे तत्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. ठाणे पट्ट्यातील चार अधिक ाऱ्यांनी चंद्रपूर येथे वणवा नियंत्रण कार्यशाळेत सहभागी होवून प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी सहा वनविभागातील सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना वणवा नियंत्रणाबाबत प्रशिक्षण दिलेले आहे.