पेण तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका
By Admin | Published: April 2, 2016 02:42 AM2016-04-02T02:42:23+5:302016-04-02T02:42:23+5:30
ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्यभरात जाहीर झाला असून, या अनुषंगाने पेण तालुक्यातील कोपर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सात जागांसाठी काँग्रेस
पेण : ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्यभरात जाहीर झाला असून, या अनुषंगाने पेण तालुक्यातील कोपर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सात जागांसाठी काँग्रेस पक्षातर्फे नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँगे्रस युवा नेते व राजिप माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील तसेच कोपर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माजी सदस्य नवनाथ म्हात्रे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. शनिवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असूनही सार्वत्रिक आणि आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीमधील १५ जागांसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी निरुत्साही वातावरण पेण तहसील कार्यालयात पाहावयास मिळाले.
पेणची कोपर ग्रामपंचायत सध्या शेकापच्या ताब्यात आहे. यापूर्वी कोपरवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. आता पुन्हा कोपर ग्रामपंचायत ताब्यात घेण्याच्या काँग्रेसतर्फे जोरदार हालचाली सुरू आहेत. सत्तास्थानी असलेल्या शेकापतर्फे शनिवारी अंतिम दिवशी उमेदवारी अर्ज सादर केले जातील. मात्र येथील दोन्ही पक्षांत कांटे की टक्कर आहे. एकूण सात जागांपैकी कोणता पक्ष चार जागा जिंकतो, यावरून दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारी अर्ज सादर करून शेकापला चुचकारले आहे. प्रत्यक्ष सामना ६ एप्रिलनंतर राजकीय प्रचारात होणार आहे. १७ एप्रिलला यासाठी मतदान होणार असून, ८ एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राजकीय प्रचारास प्रारंभ होईल, असे चित्र आहे. दुसरीकडे मात्र ज्या ८ ग्रापंचायतींत रिक्त १५ जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत, त्या ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपर्यंत निरुत्साही वातावरण होते. उद्या उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. ४ एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी सकाळी ११ वाजता, तर ६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होऊन रणांगणावरचे खरे चित्र स्पष्ट होईल. १७ एप्रिलला मतदान व १८ एप्रिलला निकाल असा निवडणूक कार्यक्रम आहे. (वार्ताहर)
या जागांसाठी पोटनिवडणूक
बेलवडे, अनुसूचित जमाती स्त्री राखीव ३ जागा, आंबिवली अनुसूचित जमाती स्त्री १ जागा, शेडाशी नामप्र स्त्री १, अनुसूचित स्त्री एक व नामप्र/पुरुष १ जागा अशा एकूण ३ जागा निधवली, नामप्र १ जागा, वरप नामप्र २ जागा, वरप नामप्र १ जागा, करोटी नामप्र एक जागा, वरेडी अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती स्त्री राखीव दोन जागा अशा एकूण तीन जागा व महलमिऱ्या डोंगर सर्वसाधारण स्त्री राखीव एक जागा अशा एकूण १५ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.