८०० फूट दरीत फेकूनही गर्भवती सुखरूप, पेब किल्ल्याजवळील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 05:17 AM2018-04-03T05:17:44+5:302018-04-03T05:17:44+5:30
माथेरान-नेरळ मिनी ट्रेन रेल्वे ट्रॅकमधील पेब किल्लाजवळ (कड्यावरचा गणपती) गर्भवती पत्नीला ८०० फूट खोल दरीत फेकून दिल्याची घटना सोमवारी घडली. याची माहिती जुम्मापट्टी येथील रहिवासी, तसेच नेरळ-माथेरान टॅक्सी चालकांना कळताच, यांनी हा प्रकार माथेरान, नेरळ पोलिसांना सांगितला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, माथेरानमधील सह्याद्री मित्र रेस्क्यू टीम व स्थानिक आदिवासींच्या साहाय्याने महिलेला खोल दरीतून बाहेर काढले आहे.
नेरळ - माथेरान-नेरळ मिनी ट्रेन रेल्वे ट्रॅकमधील पेब किल्लाजवळ (कड्यावरचा गणपती) गर्भवती पत्नीला ८०० फूट खोल दरीत फेकून दिल्याची घटना सोमवारी घडली. याची माहिती जुम्मापट्टी येथील रहिवासी, तसेच नेरळ-माथेरान टॅक्सी चालकांना कळताच, यांनी हा प्रकार माथेरान, नेरळ पोलिसांना सांगितला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, माथेरानमधील सह्याद्री मित्र रेस्क्यू टीम व स्थानिक आदिवासींच्या साहाय्याने महिलेला खोल दरीतून बाहेर काढले आहे. तिच्या पतीला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, तिने पतीविरोधात तक्रार देण्यास नकार दिला आहे.
माथेरान येथील कड्यावरचा गणपती पाहण्यासाठी सुरेश पवार पत्नी विजया, तसेच लहान मुलगा आयानसोबत फिरण्यासाठी आले होते. मंत्रालयात ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या सुरेशचा ९ महिन्यांपूर्वी विजयाशी प्रेमविवाह झाला होता. विजयाला पहिल्या नवºयापासून तीन अपत्ये आहेत. दोन मुले चेन्नई येथील हॉस्टेलमध्ये शिकत असून, लहान मुलगा तिच्यासोबत राहतो. लग्नानंतर विजयाने सुरेशकडे घरी नेण्याचा तगादा लावला होता. रोजच्या कटकटीला कंटाळून सुरेशने तिचा काटा काढण्याचे ठरविले.
चर्चगेटहून माथेरानला फिरण्याच्या बहाण्याने आलेल्या सुरेशने विजयाला मिनी ट्रेन रेल्वेलगत कड्यावरचा गणपती (पेब किल्ला) या ठिकाणापासून जवळच असलेल्या ८०० फूट दरीत फेकून दिले.
नेरळ व माथेरान पोलिसांना जेव्हा एक महिला जखमी अवस्थेत अडकल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी जुम्मापट्टी येथील आदिवासी तरुणांकडून, तसेच वनविभागाच्या मदतीने तिला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पोलिसांनी सह्याद्री मित्र माथेरान रेस्क्यू टीमला पाचारण केले. या वेळी आदिवासी तरु णांच्या साह्याने रेस्क्यू टीमने गर्भवती विजयाला खोल दरीतून सुखरूप बाहेर काढले.
विजयाला जबर दुखापत झाल्याने कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.