कर्जत खून प्रकरण : पतीनेच केला खून, किरकोळ भांडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:37 AM2017-11-18T01:37:50+5:302017-11-18T01:38:07+5:30
शहरातील मानस कॉम्प्लेक्सचा वॉचमन धुरूपसिंग झपटसिंग कुमाल याची पत्नी लक्ष्मी (२९) यांचा नैसगिक मृत्यू झाला की हत्या झाली अशी चर्चा कर्जतमध्ये होती. चार दिवसांच्या प्रयत्नांनंतर त्या महिलेचा खून तिच्या पतीनेच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. किरकोळ भांडणातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
कर्जत : शहरातील मानस कॉम्प्लेक्सचा वॉचमन धुरूपसिंग झपटसिंग कुमाल याची पत्नी लक्ष्मी (२९) यांचा नैसगिक मृत्यू झाला की हत्या झाली अशी चर्चा कर्जतमध्ये होती. चार दिवसांच्या प्रयत्नांनंतर त्या महिलेचा खून तिच्या पतीनेच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. किरकोळ भांडणातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता कर्जत पोलिसांना मानस कॉम्प्लेक्सच्या एका खोलीत एक महिला जखमी अवस्थेत पडली आहे असा दूरध्वनी आला. या कॉम्प्लेक्स खोलीमध्ये धुरूपसिंग कुमाल आणि त्याची पत्नी लक्ष्मी आपल्या दोन मुलांसह राहत होती. पोलिसांना घटनास्थळी लक्ष्मी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली होती. तिच्या बाजूला एक लोखंडी मांडणी पडली होती त्यामुळे हा घात की अपघात असा प्रश्न पोलिसांना पडला होता.
ही घटना नक्की कशामुळे घडली यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस निरीक्षक अशोक ठाकूर, सहायक पोलीस अजित शिंदे , पोलीस उपनिरीक्षक आर. आर. आडगळे, सहायक फौजदार एस. एस. राजमाने, नितीन अहिरे, सदाशिव शिंदे, रोहित मोरे, दशरथ मोकल, प्रशांत देशमुख, शैलेश कदम, रमेश दोरताले, सचिन व्हसकोटी, सागर नायकुडे आदींचे पथक घटनास्थळी पोहचले. अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.
पोलिसांच्या तपासात लक्ष्मीचा पती धुरूपसिंग कुमाल याच्याकडे चौकशी केली असता आपली पत्नी लक्ष्मी हिच्या डोक्यावर घरातील साहित्य ठेवलेली लोखंडी मांडणी पडली व त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा अशी दिशाभूल करणारी माहिती दिली होती. तसेच ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी मी स्टेट बँक आॅफ इंडिया कर्जत शाखेतमध्ये पैसे भरण्याकरिता गेलो असल्याचे सांगितले. कुमाल प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करत होता. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी विश्वास न ठेवता वेगळ्या दिशेने फिरवली आणि त्यांनी शहरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज जमा करून त्याचा अभ्यास केला. सुमारे शंभरहून अधिक नागरिकांकडे तपास केला. त्यावरून स्वत:चा बचाव करणाºया धुरूपसिंग कुमाल याची चौकशी केली असता त्यानेच पत्नीचा खून केला आहे हे पोलिसांच्या लक्षात आले.
शुक्रवारी पाचव्या दिवशी तशी कबुली त्याने दिली. सायंकाळी सहाच्या सुमारास त्याला अटक केली.