महाविकास आघाडीचे नेते पुढारी प्रचारासाठी नव्हे तर पर्यटनासाठी येतात - आ.महेश बालदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 04:16 PM2024-05-12T16:16:55+5:302024-05-12T16:18:24+5:30
आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या जनसंवाद सभेतून महाविकास आघाडीचे नेते, पुढारी मावळमध्ये प्रचारासाठी नव्हे तर पर्यटनासाठी येतात अशी टीका भाजप आमदार महेश बालदी यांनी उरणमध्ये आयोजित जनसंवाद सभेतून केली.
मधुकर ठाकूर
उरण : महाविकास आघाडीचे नेते, पुढारी मावळमध्ये प्रचारासाठी नव्हे तर पर्यटनासाठी येतात अशी कडवट टीका भाजप आमदार महेश बालदी यांनी उरणमध्ये आयोजित जनसंवाद सभेतून केली. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांची सभा
उरणमध्ये पार पडल्यानंतर त्याच ठिकाणी त्याच स्टेजवर बारणे यांच्या प्रचारासाठी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या जनसंवाद सभेतून महाविकास आघाडीचे नेते, पुढारी मावळमध्ये प्रचारासाठी नव्हे तर पर्यटनासाठी येतात अशी कडवट टीका भाजप आमदार महेश बालदी यांनी उरणमध्ये आयोजित जनसंवाद सभेतून केली. जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भुखंड वाटपावरून शेकाप आमदार जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महेश बालदी यांनी शेतकऱ्यांना खोटी इरादा पत्र देऊन फसवणूक केल्याचा गंभीर आरोप उरणच्या प्रचारसभेतुन केला होता.
आमदार जयंत पाटील यांच्या आरोपामुळे संतप्त झालेल्या आमदार महेश बालदी यांनी शेतकरी व प्रकल्पग्रस्तांची शेकाप पर्यायाने जयंत पाटलांनीच फसवणूक केली असल्याचा आरोप करून प्रत्युत्तर दिले.फसवणूक केल्यानेच तुम्हाला लोकांनी घरी बसवले.त्यामुळे अलिबागमधील एकही जागा निवडून आणू शकलेले आमदार जयंत पाटील उगाच गावच्या पाटीलकी करीत सांगोला, सांगलीत प्रचारासाठी फिरताना दिसतात.जयंत पाटील साडेबारा टक्के विकसित भुखंड वाटपाबाबत मी खोटे बोलत असेन तर मी राजकारण सोडायला तयार आहे.तुम्ही काय सोडणार ते सांगा असे प्रती आव्हान आमदार बादली यांनी दिले.शेकापचे दुसरे माजी आमदार विवेक पाटील कर्नाळा बॅकेत केलेल्या ५४८ घोटाळा प्रकरणी तीन वर्षांपासून जेलमध्ये बसले आहेत.
करंजा मच्छीमार बंदराच्या पायाभरणी समारंभासाठी आलेल्या आमदारांनी ही आयडिया माझीच असल्याचे सांगितले.या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेताना आमदार महेश बालदी यांनी नुसती आयडिया असुन उपयोगाचे नाही.तर खिशात पैसेही असावे लागतात. केंद्र,राज्य सरकारच्या मदतीने १५० क़ोटी रुपये खर्चून हे बंदर उभारण्यात आले आहे.अतिरिक्त आवश्यक खर्चाच्या रकमेचीही लवकरच करून येत्या चार महिन्यांत या करंजा मच्छीमार बंदराचे काम पूर्ण केले जाईल असा दावाही बालदी यांनी केला.
नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणी समारंभासाठी येथील आमदारांना आमंत्रित करण्यात आले आले होते.मात्र स्टेज शेअर करण्याऐवजी हे आमदार महाशय दिड किमी अंतरावर निषेधाचे काळे झेंडे दाखवत आंदोलन करीत राहिले.मग नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठेकेदारीची कामे नाकारण्याऐवजी करण्यातच आघाडीवर होते. मग ठेकेदारीची कामे घेताना, करताना काहीच कसे वाटले नाही अशी घणाघाती टीकाही आमदार महेश बालदी यांनी केली.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष भोईर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पिंगळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष रवी भोईर, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर, मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, आरपीआयचे तालुका अध्यक्ष संजय गायकवाड तसेच सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.