महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे यांचा खूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 06:37 AM2018-03-02T06:37:07+5:302018-03-02T06:37:07+5:30
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे-गोरे यांचा खूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याचा बालमित्र महेश पळणीकर यानेच ही कबुली दिली आहे.
पनवेल (जि. रायगड ) : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे-गोरे यांचा खूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याचा बालमित्र महेश पळणीकर यानेच ही कबुली दिली आहे. अश्विनी यांची हत्या करुन लाकूड कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे करुन ते वसईच्या खाडीत फेकल्याची धक्कादायक माहितीही महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे यांचा खूनच पळणीकरने दिली आहे.
पळणीकर तसेच कुरुंदकरच्या खासगी गाडीचा चालक कुंदन भंडारी या दोघांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी ही माहिती देत दोघांच्याही पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलीसांनी केली. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
अश्विनी बिद्रे यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याच्या संशयावरून नवी मुंबई पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक केल्यानंतर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील यालाही अटक केली होती. कुरुंदकर याला चालक भंडारीने मदत केल्याचा संशय असल्याने गेल्या आठवड्यात पोलिसांनी त्यालाही अटक केली होती. भाईंदर येथून ज्या दिवशी अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या, त्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास भंडारीच्या मोबाइलचे लोकेशनसुद्धा त्याच परिसरात असल्याचे आढळून आले होते. पुण्याहून रात्री उशिरा आल्याने भाईंदर येथील बंटास हॉटेलमध्ये मुक्काम केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. अश्विनी गायब झाल्या त्या दिवशी म्हणजेच ११ आणि १२ एप्रिल २०१६ रोजी चारही आरोपी सीडीआरमध्ये एकत्र आढळून आले होते.