मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:27 AM2018-07-31T03:27:38+5:302018-07-31T03:27:54+5:30
मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण वाहतूकदार व प्रवाशांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे. खड्डे व रुंदीकरणामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे या मार्गावर वारंवार वाहतूककोंडी होत असून अपघातांमध्येही वाढ झाली आहे.
- वैभव गायकर
पनवेल : मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण वाहतूकदार व प्रवाशांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे. खड्डे व रुंदीकरणामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे या मार्गावर वारंवार वाहतूककोंडी होत असून अपघातांमध्येही वाढ झाली आहे.
संपूर्ण महामार्गाच्या रुंदीकरणासाठी सुमारे ११ हजार कोटीपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीला पळस्पे येथून जाताना सर्वप्रथम खड्ड्यांचा सामना करावा लागतो. पळस्पे फाट्यावर सध्याच्या घडीला खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. येथून पुढे जाताना ठिकठिकाणी खड्ड्यातून मार्गक्र मण करावे लागते. पळस्पे गावापुढे तसेच पुढे शिरढोण, कर्नाळा खिंड परिसर तसेच पुढे कल्हे गावाजवळून पुढे पेणच्या दिशेने जाताना ठिकठिकाणी खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली असली तरी याठिकाणी नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे या मार्गावर धुळीचे साम्राज्य देखील मोठ्या प्रमाणात पसरले आहे. याचा सर्वात जास्त त्रास हा दुचाकी चालकांना होत आहे. खड्डे व रु ंदीकरणाच्या कामामुळे वारंवार वाहतूककोंडी होत असून या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी अत्यावश्यक कामे केली नाही तर गणेशभक्तांना गावी पोहचणे अशक्य होणार आहे.
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या चार राज्यांमधून जाणाºया मुंबई-गोवा महामार्गाच्या रु ंदीकरणाचे काम शासनाने सुरू केले आहे. १२६९ किलोमीटर एवढे अंतर असून महाराष्ट्रात ४८२ किलोमीटरचा समावेश आहे. राज्यातून जाणाºया महामार्गाचे रु ंदीकरण करण्यासाठी तब्बल ११ हजार ७४७ कोटी रु पये खर्च केले जात आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात पनवेल ते इंदापूरपर्यंत ८४ किलोमीटरच्या रोडचे रु ंदीकरण प्रत्यक्ष सुरू झाले आहे. रु ंदीकरणासाठी कर्नाळा अभयारण्यातील जवळपास १.६५ हेक्टर वनजमिनीवरील वृक्षही तोडण्यात आले आहेत. कोकणच्या विकासाचा राजमार्ग म्हणून या रोडचे वर्णन केले जात आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये सद्यस्थितीमध्ये हा रस्ता कोकणवासीयांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. पनवेल ते पेणपर्यंतची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. रुंदीकरणासाठी जागोजागी खोदकाम केले आहे. खड्ड्यांमुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहेत. अपघात होण्याची सूचना देण्यासाठी कंत्राटदार कंपनीने काही ठिकाणी पट्ट्या, बोर्ड लावलेले असले तरी अनेक ठिकाणी हा महामार्ग धोकादायक आहे.
सर्व्हिस रोडवर अवजड वाहनांचे पार्किंग
महामार्गाला लागून असलेल्या गावांनाही याचा मोठा फटका बसला आहे. चिंचवण, पळस्पे, कल्हे व इतर अनेक गावांमधील नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. या गावाजवळ असलेल्या सर्व्हिस रोडवर अवजड वाहनांनी अनधिकृतपणे कब्जा केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीमध्ये सकाळी व सायंकाळी वाहनांची संख्या वाढल्यानंतर वाहतूककोंडी होत आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यापूर्वी खड्डे दुरु स्त केले नाहीत व अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे केली नाही तर गणेशभक्तांना मोठा फटका बसणार आहे.
प्रस्तावित सर्व्हिस रोड
पळस्पे, चिंचवन, तारा, जिते, पेणमध्ये ३, उचिवडे, वडखळ, गडब, कासू, पंडापूर, पटनी, निगडे, कोलेती, नागोठणे, खांब, कोलाड, तळवली
वाहनांसाठी भुयारी मार्ग
चिंचवन, खोपोली जंक्शन, पेण, वडखळ बायपास, नागोठणे, कोलाड
पादचारी भुयारी मार्ग
पळस्पे, तारा, जिते, पेण, उचिडे, गडब, कासू, निगाडे, कोलेती, नागोठणे, खांब, तळवली, रातवड
महत्त्वाचे यू टर्न
तुरमळे, चिंचवन, कर्नाळा किल्ला, कल्हे, आपटा फाटा, आंबिवली, वीरवाडी, खोपोली, वाशी, वडखळ, इस्पात फॅक्टरी, जुई, अक्कादेवी मंदिर, आमटे, खटाळे, निदी, नागोठणे, पाली, अलिबाग, सुकेली, पुगाव, कोलाड, घोटवले, वावेदीवाडी, गांगेवाडी, नागरोली
महामार्गाचे स्वरूप
मुंबई-गोवा हा देशातील महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. अरबी समुद्राच्या किनारपट्टीला १२६९ किलोमीटर हा महामार्ग असून, मुंबईला केरळमधील कोची शहराशी जोडत आहे. महाराष्ट्रात ४८२, गोवा १३९, कर्नाटक २८०, केरळमध्ये ३६८ किलोमीटर अंतर आहे. पनवेल, चिपळूण, महाड, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी ही या महामार्गावरील कोकणातील महत्त्वाची शहरे आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यास आम्ही यापूर्वीच सुरु वात केली आहे. गणेशोत्सवापूर्वी या महामार्गावरील सर्व खड्डे बुजले जातील, तसेच आवश्यक उपाययोजना राबविल्या जातील.
- हेमंत फेगडे,
अधीक्षक अभियंता,
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
पनवेलहून पेणच्या दिशेने जाताना खड्ड्यांमुळे अक्षरश: कंबरडे मोडल्यागत होते. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका देखील निर्माण झाला असून लवकरात लवकर हे खड्डे बुजून रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे.
- श्यामसुंदर माने,
प्रवासी