उधाणाने १५ ठिकाणी फुटले संरक्षक बंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 06:55 AM2018-02-02T06:55:13+5:302018-02-02T06:55:22+5:30
खाडी किनारच्या गावांलगतचे संरक्षक बंधारे फुटीची समस्या सातत्याने गंभीर होत असताना, शासकीय यंत्रणा मात्र सुस्तावलेल्या अवस्थेतच आहे.
- जयंत धुळप
अलिबाग : तालुक्यातील खाडी किनारच्या गावांलगतचे संरक्षक बंधारे फुटीची समस्या सातत्याने गंभीर होत असताना, शासकीय यंत्रणा मात्र सुस्तावलेल्या अवस्थेतच आहे. बुधवारी रात्री आलेल्या उधाणाच्या भरतीने अलिबाग तालुक्यातील धेरंड- शहापूर गावांच्या पूर्वेकडील समुद्र भरती संरक्षक बंधाºयांना एकूण १५ ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी) पडून समुद्राचे खारे पाणी या दोन्ही गावांच्या हद्दीतील तब्बल एक हजार एकर भातशेती क्षेत्रात घुसून नुकसान झाले असल्याची माहिती मोठे शहापूर गावातील बाधित शेतकरी आत्माराम गोमा पाटील यांनी दिली आहे.
मोठे शहापूर जवळच्या भंगारकोठा संरक्षक बंधाºयाच्या दुरुस्तीची कामे यापूर्वी तीन वेळा नऊ गाव शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तर पाच वेळा गावकीच्या माध्यमातून श्रमदानातून करण्यात आली होती. मात्र, शासनाच्या खारलॅन्ड विभागाने या बंधाºयांची कधीही दुरुस्ती केली नाही. अखेर बुधवारी रात्री या बंधाºयास तीन ठिकाणी मोठी भगदाडे पडून खारे पाणी शेतजमिनीत घुसले असल्याचे आत्माराम पाटील यांनी सांगितले.
शहापूर गावाच्या पूर्वेला असलेल्या संरक्षक बंधाºयास एकूण १२ ठिकाणी मोठी भगदाडे पडली आणि खारे पाणी भातशेतीत घुसले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अलिबागचे प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे त्यांच्या पथकासह कांदळवनांची पाहणी करण्याकरिता येथे आले असता, येथील कमकुवत झालेले आणि फु टलेले बांध त्यांनी स्वत: पाहिले होते. फुटलेल्या बांधामुळे त्यांना पलीकच्या बाजूला जाताही आले नव्हते. याबाबत ते सरकारी अहवाल तत्काळ देतील आणि बांधांची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा आम्हा ग्रामस्थांना होती; परंतु ते घडले नाही. अखेर समुद्राच्या उधाणाने हा बांध फुटला आणि अखेर अनर्थ घडल्याची संतप्त प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.
पेण तालुक्यात धरमतर खाडी किनारच्या फुटलेल्या बांधाच्या दुरुस्तीकरिता पेणच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी अनेक बैठका घेऊन बांध बांधण्याच्या कामाला शेतकरीहित विचारात घेऊन प्राधान्य दिले आहे. मात्र, अलिबाग तालुक्यात अशी परिस्थिती दिसून येत नाही. परिणामी, ही दोन्ही गावे उधाणाच्या भरतीने उद्ध्वस्त करून मोकळी झालेली जागा कंपनीला देण्याचे कटकारस्थान येथे सुरू असल्याचा दाट संशय असल्याचा दावा आत्माराम गोमा पाटील यांनी केला आहे.
संयुक्त बैठकही केली रद्द
अलिबाग तालुक्यातील याच शहापूर-धेरंड या गांवांच्या हद्दीतील संरक्षक खारबांध फुटीच्या गंभीर समस्येमध्ये लक्ष घालून गावातील मानवी वसाहतींना धोका पोहोचण्याअगोदर उपाययोजनेकरिता संयुक्त बैठकीचे आयोजन करावे, अन्यथा शेतकरी जनतेला एमआयडीसीच्या कार्यालयासमोर भातशेतीतला चिखल आणून टाकण्यावाचून कोणताही पर्याय समोर दिसत नाही, असा इशारा गेल्या १२ डिसेंबर २०१७ रोजी नवीन पनवेलमधील खांदा वसाहतीतील महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कार्यालयातील प्रादेशिक अधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांना श्रमिकमुक्ती दलाने दिल्यावर, या विषयाबाबत निर्णय घेण्याकरिता गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी ठोंबरे यांनी संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.
मात्र बुधवारी रात्री उशिरा ही बैठक रद्द करण्यात येत असल्याचे प्रादेशिक अधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी कळविल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. बैठकीत शेतकºयांना नेमके काय उत्तर द्यायचे आणि बंधाºयांची दुरुस्ती कशी करायची आणि झालेल्या नुकसानीची भरपाई कशी आणि कोणी द्यायची, या प्रश्नांवरून ही बैठकच रद्द करुन आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ शेतकºयांची आहे.