रेल्वे प्रशासनाचे लौजी, डोलवली, केळवली स्थानकांकडे दुर्लक्ष, प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 02:27 AM2019-06-27T02:27:53+5:302019-06-27T02:28:11+5:30
मध्य रेल्वे प्रशासनाचे कर्जत-खोपोली रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या लौजी, डोलवली, केळवली स्थानकांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथे प्रवाशांना पाणी, शौचालयासारख्या मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत.
कर्जत - मध्य रेल्वे प्रशासनाचे कर्जत-खोपोली रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या लौजी, डोलवली, केळवली स्थानकांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथे प्रवाशांना पाणी, शौचालयासारख्या मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत.
मध्य रेल्वे प्रशासन दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशांविषयीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे; परंतु हवा तेवढा आर्थिक लाभ मिळत नसलेल्या रेल्वे स्थानकांच्या समस्यांकडे मध्य रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष करत आहे. कर्जत-खोपोली दरम्यान असलेल्या लौजी, डोलवली व केळवली रेल्वे स्थानकांची दुरवस्था झाली आहे. तिन्ही रेल्वे स्थानकात पाणीपुरवठा होत नसल्यामुळे येथील प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील शौचालयांची अवस्था दयनीय आहे.
लौजी रेल्वे स्थानकातील फाटकातून अनेक वाहने ये-जा करतात. त्यामुळे फाटकावरील सिमेंट काँक्रीटचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे, रस्त्यावरील सिमेंट काँक्रीट निघून गेले आहे. पण या सर्व बाबींचा योग्य तो निर्णय घेणारे अधिकारी मात्र उंटावरून शेळ्या हाकतात. त्याप्रमाणे वातानुकूलित कार्यालयात बसून मोठमोठ्या गोष्टी करत आहेत तरी, मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्जत -खोपोली रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या स्थानकांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी केली आहे.