वांद्रे कोंड येथे बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:37 AM2017-12-04T00:37:58+5:302017-12-04T00:39:07+5:30
गेल्या १५ दिवसांत दासगावमधील वांद्रे कोंड येथे बिबट्याने दहशत माजवत नऊ गुरांचा फडशा पाडला, तर बिबट्याच्या हल्ल्यातून बचावलेल्या एका गाईवर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत
दासगाव : गेल्या १५ दिवसांत दासगावमधील वांद्रे कोंड येथे बिबट्याने दहशत माजवत नऊ गुरांचा फडशा पाडला, तर बिबट्याच्या हल्ल्यातून बचावलेल्या एका गाईवर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. दुभत्या जनावरांवर होणारे हल्ले आणि भरदिवसा येथील काही ग्रामस्थांना बिबट्याचे झालेले दर्शन यामुळे दासगाव वांद्रे कोंड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रायगड किल्ल्याकडून येणारा डोंगर भाग आणि माणगाव तालुक्याला जोडलेल्या जंगलामध्ये दासगाव भागातील वांद्रे कोंड ही एक वाडी आहे. केवळ २२ घरांची वस्ती असलेल्या येथील रहिवाशांचा मुख्य व्यवसाय दूधदुभते हाच आहे. त्यामुळे वांद्रे कोंड येथील माणसांच्या प्रमाणात गुरांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या १५ दिवसांपासून दासगाव वांद्रे कोंड आणि लगत असलेल्या बामणे कोंड परिसरात बिबट्याचा संचार आढळून आला आहे. येथील ग्रामस्थांकडून गाय, वासरू, बैल आणि खोंडावर बिबट्याने हल्ले चढवले आहेत. ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार १० जनावरांवर बिबट्याने हल्ला चढवला आहे. यामध्ये बामणे कोंड येथील रमेश मोरे यांची गाय बचावली असून, तिच्या मानेला आणि तोंडाला दुखापत झाली आहे.
दासगावमधील गुरांचे डॉक्टर उदय इनामदार हे गाईवर आठवडाभरापासून उपचार करत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यातून वाचलेली ही गाय आजही भेदरलेल्या अवस्थेत असून वाड्याच्या बाहेर पडत नाही. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे दासगाव परिसरात दहशत पसरली आहे. गाई-गुरांप्रमाणे आता रात्रीच्या वेळी बाहेर पडताना माणूसदेखील घाबरत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात गुरे दगावलेले ग्रामस्थ
गेल्या १५ दिवसांत वांद्रे कोंड परिसरात बिबट्याने आपली दहशत माजवत वांद्रे कोंड आणि बामणे कोंड येथील सुनील वनगले यांचा बैल, रमेश राणे यांचा पाडा खोंड, दिलीप दुडे यांची गाय अशी तीन गुरे तर वांद्रे कोंड येथील अनिल लुष्टे यांची गाय, रामा लुष्टे यांचा पाडा, मंगेश कामेकर यांचा पाडा, सदानंद वांद्रे यांची गाय, रमेश वांद्रे यांचे दोन बैल असे बामण कोंड आणि वांंद्रे कोंड येथील आठ ग्रामस्थांच्या ९ गुरांचा गेल्या १५ दिवसांत फडशा पाडला आहे.
मादी आणि दोन पिल्लांचा वावर
वांद्रे कोंड येथील ग्रामस्थांनी जंगल परिसरात मादी आणि दोन बिबट्याची पिल्ले पाहिली असल्याचे सांगितले. येथील गुराखी अनिल लुष्टे यांची गुरे चरत असता त्यांच्या नजरेसमोर एक गाय बिबट्याने उचलून नेली आहे. तर विनायक वांद्रे महाडमधून गावात परत येत असताना नवीन रस्त्याच्या कडेला बिबट्याला पाहिले. प्रसंगावधान दाखवत ते जीवाच्या आक ांताने ओरडले आणि बिबट्या पळून गेला, असेदेखील येथील ग्रामस्थ सांगत आहेत.