विशेष विद्यार्थिनींनी बांधल्या जवानांना राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2016 01:41 AM2016-08-19T01:41:12+5:302016-08-19T01:41:12+5:30

घरापासून दूर राहून भारतीय लष्कराचे सहयोगी लष्कर म्हणून कार्यरत असलेले ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’चे (सीआयएसएफ) जवान अहोरात्र देशातील अतिमहत्त्वाच्या आस्थापना

Specially trained jawans to defend | विशेष विद्यार्थिनींनी बांधल्या जवानांना राख्या

विशेष विद्यार्थिनींनी बांधल्या जवानांना राख्या

Next

अलिबाग : घरापासून दूर राहून भारतीय लष्कराचे सहयोगी लष्कर म्हणून कार्यरत असलेले ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’चे (सीआयएसएफ) जवान अहोरात्र देशातील अतिमहत्त्वाच्या आस्थापना, कारखाने आणि प्रसंगी भारतमातेच्या सुरक्षिततेसाठी झटत आहेत. या जवानांना ‘विशेष मुलांच्या’ आई डे केअर शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून राखी बांधून बहीण-भावाच्या आगळ्या नात्याची प्रचिती दिली. हा अनोखा उपक्रम लोकमत आणि आरसीएफ, थळ खत कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या थळ येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता.
देशाच्या रक्षणासाठी चोवीस तास कार्यरत भारतीय जवान नेहमीच आपल्या कुटुंबापासून दूर असतात. त्यामुळे त्यांना नेहमीच विविध सणांना मुकावे लागते. तेव्हा भावा-बहिणीचे नाते हे अतूट असल्याने जवांनाना त्याची कमतरता भासू नये यासाठी ‘लोकमत’ने जवानांसाठी रक्षाबंधनाच्या या उपक्रमाचे आयोजन केले होते. देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या प्रति आपुलकीची, तर विशेष विद्यार्थ्यांच्या प्रति आत्मीयतेची अशी दुहेरी सामाजिक भावना जपण्याचे काम ‘लोकमत’ने या उपक्रमातून साध्य केले.
आपला संकल्प दृढ असेल, आत्मविश्वास पक्का असेल आणि जिद्दीने पुढे जाण्याची मानसिकता असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे आई डे केअर स्कूलच्या आमच्या छोट्या भावा-बहिणींनी आपल्या आयुष्यात सिद्ध केले आहे. त्यातून त्यांनी नव्या संवेदनेसह नवी स्फूर्ती आम्हा सर्वांना दिली आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे थळ मुख्यालय प्रमुख डेप्युटी कमांडंट आशू सिंघल यांनी केले. देशामध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे १ लाख ४० हजार जवान आहेत. ३२५ युनिटद्वारे सर्व जवान सुरक्षेची जबाबदारी निभावत आहेत. हे जवान कुटुंबापासून दूर आहेत, परंतु लोकमतने आमच्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करून एक सामाजिक भान जपले हे आम्हाला आनंद देणारे आहे. लोकमत आणि आरसीएफ कंपनीचा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. लोकमतचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सिंघल यांनी सांगितले. जवान आणि समाज यांच्यातील नात्याचा धागा दृढ करण्याचे काम लोकमत करीत आहे. ही एक चांगली प्रेरणादायी सामाजिक सुरुवात देशाला दिशा देणारी असल्याचे, आरसीएफचे कार्यकारी संचालक उमेश धात्रक यांनी सांगितले. सामाजिक उपक्रमात आरसीएफ कंपनी नेहमीच लोकमतच्या सोबत राहील. या उपक्रमाच्या निमित्ताने, आई डे केअर स्कूलच्या इमारत बांधकामाचा प्रस्ताव आला आहे, त्याचा आरसीएफ सहानुभूतीपूर्वक विचार करून सहकार्य करेल, असा विश्वास धात्रक यांनी दिला.
याप्रसंगी आशू सिंघल यांच्या पत्नी रिद्धी सिंघल, सहायक डेप्युटी कमांडंट युनिटो सुमी, आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी धनंजय खामकर, आई डे केअरच्या अध्यक्षा प्रेमलता पाटील, सचिन असराणी, आई डे केअर स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वाती मोहिते आदी उपस्थित होते.

शस्त्रांची माहिती
- कार्यक्रमात साहाय्यक उपनिरीक्षक ओमप्रकाश कश्यप व हेड कॉन्स्टेबल नयन काकोटी यांनी विद्यार्थ्यांना विविध संरक्षणविषयक शस्त्रांचा परिचय करून दिला. त्यामध्ये पिस्तूल, भारतीय बनावटीची रायफल, एके-४७ सारखीच एके-एन यासह अन्य शस्त्रांचा समावेश होता. दहशतवादी, नक्षलवादी, असामाजिक घटकांना रोखण्यासाठी या हत्यारांचा वापर करण्यात येतो. वरिष्ठ अधिकारी दिलीप गिरवणकर यांनी मिमिक्री करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.

सहभोजनाच्या आस्वादाने सारेच सुखावले : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी या विशेष विद्यार्थ्यांकरिता केलेल्या खास भोजन मेजवानीचा आस्वाद सर्व मान्यवरांसोबत या विद्यार्थ्यांनी घेतला आणि सारेच सुखावून गेले. लोकमत, आरसीएफ कंपनी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून विद्यार्थ्यांना विविध वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद होता. विद्यार्थ्यांनीही सर्वांचे न चुकता आभार व्यक्त केले.

Web Title: Specially trained jawans to defend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.