मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत व समाधानकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:48 AM2017-08-05T02:48:55+5:302017-08-05T02:48:55+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत व समाधानकारक असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक जयंत फेगडे यांनी जिल्हा न्यायालयात एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान आपल्या कैफियतीत नमूद केला.
जयंत धुळप ।
अलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत व समाधानकारक असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक जयंत फेगडे यांनी जिल्हा न्यायालयात एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान आपल्या कैफियतीत नमूद केला. याबाबतचीमाहिती गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील सर्व रस्त्याच्या धोकादायक परिस्थितीबाबत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करणारे अॅड. अजय उपाध्ये यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीपासून राज्याच्या विधिमंडळापर्यंत गोवा राष्ट्रीय महामार्गाची पळस्पे(पनवेल) ते इंदापूर या टप्प्याची झालेली दुरवस्था सध्या चिंतेचा विषय आहे. दररोज किमान चार ते पाच वाहन अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी १५ आॅगस्टपूर्वी महामार्गावरील खड्डे बुजवून तो बिनधोक केला जाईल असे आश्वासन विधिमंडळाच्या अधिवेशनात दिलेले असताना, हा महामार्ग सुस्थितीत व समाधानकारक असल्याचा दावा करणे अत्यंत क्लेशदायक असल्याचे अॅड.उपाध्ये यांनी सांगितले.
महामार्गासह जिल्ह्यातील राज्य मार्गांच्या धोकादायक परिस्थितीबाबत अॅड.उपाध्ये यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी येथील जिल्हा न्यायालयातील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश एन.बी.लवटे यांच्या न्यायालयासमोर सुरु आहे. रस्त्याच्या दुरवस्थेस जबाबदार रायगड जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे पगार थांबविण्यात यावेत, अशी मागणी या याचिकेत त्यांनी केली आहे.
याचिकेची पुढील सुनावणी २८ आॅगस्टला-
दाखल कैफियतीअंती अॅड. उपाध्ये यांनी, गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या या गंभीर दुरवस्थेची प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ पाहणी करण्याकरिता न्यायालयाने ‘कोर्ट कमिशनर’ची नियुक्ती करावी असा विनंती अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. हा विनंती अर्ज न्यायालयाने मंजूर केला तर नॅशनल हायवे विभागाचा
चालू असलेला चुकीच्या पध्दतीचा कारभार समोर येवू शकणार आहे. रस्त्यांची वस्तुस्थिती, तसेच रस्त्याची गुणवत्ता, खड्डे इत्यादीबाबत सखोल माहिती स्पष्ट होवू शकेल असा विश्वास अॅड.उपाध्ये यांनी व्यक्त केला आहे. या याचिकेची पुढील सुनावणी २८ आॅगस्ट रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.