जाळ्यात अडकून कासवांचा मृत्यू ; कासव संरक्षक व संवर्धकांत चिंतेचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 03:50 AM2018-04-08T03:50:11+5:302018-04-08T03:50:11+5:30
मोठ्या मच्छीमार बोटींच्या मासे पकडण्याच्या नायलॉनच्या जाळ््यात अडकून आणि बोटींच्या पंख्यांत (इम्पेलर) जखमी होऊन दुर्मीळ प्रजातीची ‘आॅलिव्ह रिडले’ कासवांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कासव संरक्षण व संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय असणाऱ्या पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
- जयंत धुळप
अलिबाग : मोठ्या मच्छीमार बोटींच्या मासे पकडण्याच्या नायलॉनच्या जाळ््यात अडकून आणि बोटींच्या पंख्यांत (इम्पेलर) जखमी होऊन दुर्मीळ प्रजातीची ‘आॅलिव्ह रिडले’ कासवांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कासव संरक्षण व संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय असणाऱ्या पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या २० मार्च रोजी रत्नागिरीतील दापोली तालुक्यात सागरकिनारी पाच, तर अलिबाग जवळच्या वरसोली सागरकिनारी शनिवारी एक ‘आॅलिव्ह रिडले’ कासव मृतावस्थेत आढळले. गतवर्षी दिवेआगर सागरकिनारीही दोन मृत कासवे आढळल्याची माहिती वनखात्याच्या दिवेआगर येथील सागरी कासव संरक्षण व संवर्धन प्रकल्पात कार्यरत निसर्गप्रेमी फॉरेस्ट राउंड आॅफिसर हरिश्चंद्र नाईक यांनी दिली.
कासवांच्या पिल्लांचा जन्म ज्या सागरकिनारी होतो, त्याच सागरकिनारी ते मोठे झाल्यावर अंडी घालण्याकरिता येतात, हे या आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचे वैशिष्ट्य असल्याचे पर्यावरण अभ्यासक डॉ. वैभव देशमुख सांगतात. आॅलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षण व संवर्धन मोहिमेतून गेल्या १५ ते १६ वर्षांत त्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, आता त्याच कासवांचे मृत्यू रोखण्याकरिता मच्छीमारांमध्ये जनजागृतीची गरज डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.
सागरी कासवे श्वसन प्रक्रियेकरिता समुद्राच्या वरच्या भागात येतात, त्यामुळे बºयाचदा ते मासे पकडण्यासाठी असलेल्या जाळ्यात अडकतात. तर अनेकदा बोटींच्या पंख्याने जखमी होतात. वाळू उत्खननामुळे, बंदर उभारणीमुळे, तेल किंवा घातक रसायने सागरातील अपघात, सागरी कासवांचे जगण्याचे प्रमाण केवळ दहा टक्के असल्याचे देशमुख यांनी अखेरीस सांगितले.
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या सागरी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनात रायगड वनविभागाकडून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यात येत आहे. दिवेआगर, वेळास आणि हरिहरेश्वरच्या किनारपट्टीत सागरी कासवांच्या माद्या अंडी घालण्याकरिता येतात. ही अंडी संरक्षित करून जन्माला येणारी पिल्ले पुन्हा सुरक्षितरीत्या समुद्रात सोडण्याचे काम वनखात्याचे नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी १० ते १२ वनमजूर आणि निसर्ग व पर्यावरणप्रेमी करीत आहेत. गेल्या वर्षी जानेवारी २०१७मध्ये ३६७ सागरी कासवांच्या अंड्यांचे दिवेआगर परिसरात संवर्धन करून नवजात पिल्लांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. यंदा दिवेआगर सागरकिनारी दहा घरट्यांचे संरक्षण करण्यात आले असून, पैकी पाच घरट्यांतील ५६१ नवजात पिल्ले समुद्रात सोडण्यात यश आले आहे.
४० हजार कासवांच्या पिल्लांचे संवर्धन
सागरीकिनारपट्टीतील ग्रामस्थांमध्ये कासवाचे महत्त्व, सागरी कासव नष्ट झाले तर समुद्राची होणारी हानी याविषयी जनजागृती करण्यात आली. भाऊ काटदरे, जयंत कानडे, विजय महाबळ, राम मोने आदीं पर्यावरणप्रेमींनी १९९२ मध्ये चिपळूणला निसर्ग संवर्धन व संशोधनासाठी ‘सह्याद्री निसर्गमित्र मंडळ’ या संस्थेची स्थापना केली.
- कासवांच्या संवर्धनाकरिता त्यांनी किनारीभागात चळवळच उभी केली. गेल्या १६ वर्षांत सुमारे ४० हजार कासवांच्या पिल्लांचे संवर्धन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वेळास, केळशी, अंजर्ला, दाभोळ, कोळथरे, मुरुड तर रायगड जिल्ह्यात दिवेआगर, मारळ, हरिहरेश्वर आदी १५ ते २० ठिकाणी कासव संरक्षण मोहिमेचे तंबू निर्माण करण्यात यश आले आहे.