दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 07:30 AM2018-07-05T07:30:11+5:302018-07-05T11:01:30+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
रायगड - मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली आहे. महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. केंबुर्ली ते वहुर-दासगावदरम्यान खाडीलगत दरड कोसळल्याने संपूर्ण महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दोन जेसीपी व एका क्रेनच्या सहाय्याने दरडीचा ढिगारा हटवण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती रायगड वाहतूक पोलीस शाखेच प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांना दिली आहे.
काेसळलेल्या दरडीत दगडांपेक्षा लाल मातीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे, चिखलावरुन वाहने घसरण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी काेणत्याही प्रकारे घाई करु नये. वाहतूक पाेलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वराडे यांनी केले आहे. दरम्यान, मुंबईकडून गाेव्याकडे जाण्याकरता छाेट्या वाहनांसाठी 'माणगांव-निजामपुर-पाचाड-महाड' हा पर्यायी मार्गदेखील उपलब्ध आहे.
वाहतूक थांबवली
मुंबई गोवा महामार्गाच्या रूंदीकरणासाठी अनेक ठिकाणी डोंगर खोदण्यात येत आहेत. मात्र केंबुर्ली येथील डोंगर खोदण्यात आलेले काम अर्धवट सोडल्यामुळे ह्या ठिकाणी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात होती. ज्या ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत त्याठिकाणी एका बाजूला सावित्री नदीचा प्रवाह असल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती. बुधवारी (4 जुलै) रात्रभर आणि गुरुवारी (5 जुलै) पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे अखेर या धोकादायक ठिकाणच्या दरडी कोसळल्या. महामार्ग विभागाकडून दरडी बाजूला करण्याचे काम सुरू असून टोळ पुलाजवळ व महाड शहराजवळ वाहतूक थांबवण्यात आली आहे. महाडकडे येणारी वाहतूक टोळ म्हाप्रळ शिरगाव मार्गे वळवण्यात आली आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस, उपनिरीक्षक पंकज गिरी यांच्यासह महामार्ग वाहतूक पोलीस, महामार्ग विभाग घटनास्थळी कार्यरत आहेत.
नडगावजवळ देखील दरडीचा धोका
महामार्गाच्या रूंदीकरणासाठी महाड पोलादपूरदरम्यान नडगाव येथील डोंगर मोठ्या प्रमाणावर खोदून हे काम अर्धवट सोडून पावसाळ्यापूर्वी थांबवण्यात आले आहे. या ठिकाणच्या दरडीदेखील मुसळधार पावसाने कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भीतीने औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या येणाऱ्या कामगारांना आपला जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. या ठिकाणी देखील एका बाजूला सावित्री नदीचा प्रवाह असल्याने दरडी कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे.
#SpotVisuals Traffic halted on Mumbai-Goa highway following a landslide in Kemburli near Mahad due to heavy rain in the region, road clearing work underway. #Maharashtrapic.twitter.com/7gOkuhmja4
— ANI (@ANI) July 5, 2018