लोकलमध्ये मारहाण करून महिलेला लुटले
By admin | Published: June 6, 2014 01:49 AM2014-06-06T01:49:13+5:302014-06-06T09:12:04+5:30
वसई रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, जखमी महिलेला उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
Next
>मीरा रोड-दहिसर दरम्यान थरार : काठीने झोडपले, दागिने लांबवून चाराने केला पोबारा
मुंबई : पहाटेची वेळ. धावत्या लोकलमध्ये महिला डब्यात एकटीच असलेली महिला. आणि त्याचवेळी महिलेला जबर मारहाण करून केलेली लूट आणि त्याला महिलेने केलेला प्रतिकार.. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना मीरा रोड-दहिसर स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये घडली. या घटनेत महिलेवर हल्ला करून तिच्याजवळील दागिन्यांची लूट करून चोरटय़ाने पोबाराही केला. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, जखमी महिलेला उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
भाईंदर पूर्व येथे राहणा:या अपूर्वा मेधा (25) या पहाटे नोकरीवर जाण्यासाठी चर्चगेटच्या दिशेने जाणा:या लोकलमधून सेकंड क्लास महिलांच्या डब्यातून प्रवास करीत होत्या. त्या डब्यात एकटय़ाच होत्या. साधारण 4.55च्या सुमारास भाईंदर स्थानक सोडताच काही सेकंदांतच थांबलेल्या या लोकलमध्ये एक चोर चढला आणि त्याने अपूर्वा यांच्याकडे पैसे आणि दागिन्यांची मागणी केली. मात्र विरोध करताच चोराने त्यांना दमदाटी केली. लोकल सुरू होताच चोराने अपूर्वा यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याजवळील सोन्याची चेन, अंगठी, कडे आणि पायातील चांदीची पट्टी हिसकावून घेण्यास सुरुवात केली. अपूर्वा यांनी चोराला प्रतिकार केला; मात्र चोराने त्यांचे सर्व दागिने हिसकावून घेतले आणि दहिसर स्थानकात लोकल शिरताच उतरून पोबारा केला.
महिलेकडील 31 हजारांचा ऐवज लंपास
सोन्याची चेन, अंगठी, पायातील चांदीची पट्टी, सोन्याचे कडे असा 31 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटण्यात आला.
मागील चार महिन्यांतच महिला प्रवाशांबाबत 25 गुन्हे घडले आहेत. तर गेल्या वर्षभरात 79 गुन्हे घडले होते. हे प्रमाण पाहता यंदाच्या चार महिन्यांत घडलेले गुन्हे अधिक असल्याचे दिसून येते.