रत्नागिरीतील बालविश्व गुन्हेगारीच्या विळख्या, सतरा महिन्यांत ७७ बालगुन्हेगार ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 04:17 PM2018-05-28T16:17:26+5:302018-05-28T16:17:26+5:30
रत्नागिरीत गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये खून, बलात्कार, दरोडा यांचे प्रमाण वाढत असून, चोरी हा प्रकार तर नित्याचाच झाला आहे. मात्र, त्याचबरोबर चिंतेचा विषय म्हणजे आता बालगुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. विविध गुन्ह्यांमध्ये आता बालगुन्हेगारीचा शिरकाव झाल्याचे गेल्या वर्षभरातील आकडेवारीवरून दिसून येत आहे.
विहार तेंडुलकर
रत्नागिरी : रत्नागिरीत गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये खून, बलात्कार, दरोडा यांचे प्रमाण वाढत असून, चोरी हा प्रकार तर नित्याचाच झाला आहे. मात्र, त्याचबरोबर चिंतेचा विषय म्हणजे आता बालगुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. विविध गुन्ह्यांमध्ये आता बालगुन्हेगारीचा शिरकाव झाल्याचे गेल्या वर्षभरातील आकडेवारीवरून दिसून येत आहे.
चोऱ्यांमध्ये बालगुन्हेगारांचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. गेल्या १७ महिन्यांत ७७ बालगुन्हेगारांना पोलिसांनी अटक केले आहे. विशेष म्हणजे एप्रिल २०१८ या केवळ एका महिन्यात तब्बल ९ बालगुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्यांची उकल होत असली तरी गुन्हेगारांना म्हणावी तेवढी जरब बसलेली नाही. त्यामुळे गुन्हेगारांना अटक होण्याचे प्रमाण चांगले असले तरी गुन्ह्यांचे प्रमाणही तेवढेच आहे. गेल्या चार वर्षात या गुन्ह्यांमध्ये लहानग्या मुलांचा अंतर्भाव हाही एक चिंतेचा विषय ठरला आहे. रत्नागिरीसारख्या ठिकाणी ज्याकाळात गुन्हेगारीचे प्रमाणच कमी होते, त्याठिकाणी आता गुन्हेगारीबरोबरच बालविश्वही गुन्हेगारीत ओढले जात असल्याची खंत आहे.
अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत बालगुन्हेगार जास्त करून चोऱ्यांमध्ये सक्रिय असल्याचे दिसून येते. अनेक चोऱ्यांमध्ये हे बालगुन्हेगार अडकले आहेत. सन २०१५मध्ये रत्नागिरीत थिएटरबाहेर उभ्या करून ठेवलेल्या सायकल चोरणारी बालगुन्हेगारांची टोळीच पोलिसांनी ताब्यात घेतली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार, पॉकेटमनीसाठी ही मुले थिएटरमध्ये सिनेमाचा शो सुरु असताना थिएटरबाहेर उभ्या करून ठेवलेल्या सायकल चोरून नेत असत आणि त्या विकत असत. त्यातून ते स्वत:चा पॉकेटमनी बनवत असत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात बालगुन्हेगार किती सक्रिय झाले आहेत, याचा अंदाज येईल.
बालगुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे, हे खरं आहे. परंतु, रेल्वे सुरु झाल्यानंतर परजिल्ह्यातून, परप्रांतातून रत्नागिरी जिल्ह्यात लोकांचे लोंढे वाढत आहेत. बहुतांशी बालगुन्हेगार हे परप्रांतातीलच आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बालगुन्हेगारही आहेत. मात्र, त्यांचे प्रमाण त्यामानाने कमी आहे. बालगुन्हेगारांतही पाकीटमारी करणारे, अन्य धाडसी चोऱ्या करणाऱ्यांचा समावेश अधिक आहे.
- मुकुंद पानवलकर,
अध्यक्ष, बालगृह आणि निरीक्षणगृह संस्था, रत्नागिरी
कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळवणे हा अलिकडे लहान मुलांनाही छंद जडला आहे. त्यातूनच ते पाकीटमारी वगैरे करू लागतात. मध्यंतरी तर असं लक्षात आलं की, दुचाकी चोरीमध्ये मोठ्या प्रमाणावर बालगुन्हेगारांचा सहभाग आहे. चोरीच्या गुन्ह्यांबरोबरच मुलींच्या छेडछाडमध्येही शाळकरी मुले दिसून येत आहेत. प्रेमप्रकरणातूनही गुन्हे दाखल होत आहेत. मुलं चंगळवादाकडे वळू लागली आहेत आणि त्यासाठी कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपली इच्छा पूर्ण झाली पाहिजे, अशी त्यांची मानसिकता बनू लागली आहे. गुन्हेगारीमध्ये मुलांचा सहभाग हा अलिकडे खरोखरच चिंतेचा विषय ठरला आहे.
- मितेश घट्टे,
अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी
२७ बालगुन्हेगार
रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०१७ दरम्यान २३ बालगुन्हेगारांना अटक करण्यात आले तर मे, जूनमध्ये एकाही बालगुन्हेगाराला अटक करण्यात आलेले नाही. जुलै ते डिसेंबरदरम्यान २७ बालगुन्हेगारांना अटक करण्यात आले. जानेवारी २०१८ ते मे या पाच महिन्यांत २७ बालगुन्हेगारांना अटक करण्यात आले आहे.
रिमांड होममध्ये तीन मुले बालगुन्हेगार
रत्नागिरी रिमांड होम (बालगृह व निरीक्षणगृह)मध्ये सध्या ५० मुले राहतात. यामध्ये ३ मुले ही बालगुन्हेगार आहेत. उर्वरित मुले ही गरिबीमुळे वा अनाथ म्हणून संस्थेत दाखल आहेत. तीन बालगुन्हेगारांपैकी चोरी अन् मुलीचा विनयभंग अशा प्रकरणात अटक केलेल्या दोघांचा समावेश आहे. या तिघांपैकी दोघेजण स्थानिक आहेत, एक कर्नाटक येथील असून, तो गुहागर येथे अनेक दिवसांपासून वास्तव्यास आहे.
एप्रिलमध्ये नऊ ताब्यात
रत्नागिरी जिल्ह्यातील बालगुन्हेगारी विश्वावर नजर टाकली तर धक्कादायक आकडेवारी लक्षात येईल की, गेल्या सतरा महिन्यांत ७७ बालगुन्हेगारांना पोलिसांनी अटक केले आहे. अख्ख्या एप्रिल २०१८..या एकाच महिन्यात नऊ बालगुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे तर मे महिन्यात जिल्ह्यात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सर्वाधिक चोरटे
जानेवारी २०१७ ते मार्च २०१८ दरम्यान अटक करण्यात आलेल्या ६६ बालगुन्हेगारांपैकी बहुतांशी गुन्हेगार हे स्थानिक आहेत. त्यामध्ये बहुतांशी गुन्हेगार हे चोरीच्या गुन्ह्यात सापडले आहेत.
केवळ दोन महिन्यात २१ अटकेत
एप्रिल महिन्यात ९ बालगुन्हेगारांना पोलिसांनी अटक केले. यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६, ग्रामीण - १, खेड, दापोली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली. मे महिन्यात दोन बालगुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये एकावर चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर अन्य एकावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. चिपळुणात अटक केलेला बालगुन्हेगार हा अवघ्या १० वर्षांचा आहे. जानेवारी २०१७मध्ये १२ बालगुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. त्याखालोखाल एप्रिल २०१८मध्ये एकूण ९ बालगुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
अन्य गुन्ह्यांतही सहभाग
चोºयांबरोबरच मुलींशी छेडछाड तसेच अन्य गुन्ह्यांमध्येही बालगुन्हेगारांचा सहभाग वाढत आहे. एवढेच नव्हे तर आपल्या प्रेमिकेसोबत पळून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. चोरी अन् मुलींशी छेडछाड यामध्ये मुलांचा सहभाग वाढता आहे.
पॉकेटमनीसाठी चोरीचा पैसा...
चिमुकल्यांना घरातून मिळणारा पॉकेटमनी हा एक चिंतेचा विषय आहे. आपल्या मित्रांना पॉकेटमनी मिळत असेल आणि आपल्याला तो हवा त्या प्रमाणात मिळत नसेल, तर त्यातून चोरीच्या मार्गाने पैसा मिळवण्याकडे आता मुलांचा कल वाढल्याचे दिसून येते.
काही बालगुन्हेगार अट्टल चोरटे..
पुरेसा पॉकेटमनी ही आता लहान मुलांची गरज बनली आहे आणि जर तो मिळत नसेल तर कोणत्याही मार्गाने तो मिळवण्याची तयारी मुलांच्या मानसिकतेत होऊ लागली आहे. त्यातूनच चोºयांचे प्रमाण वाढत असून काही बालगुन्हेगार हे तर अट्टल चोरटे आहेत.