‘अतिक्रमण हटाव’मुळे रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, चिपळूण नगर परिषदेकडून कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 01:17 PM2018-02-09T13:17:56+5:302018-02-09T13:18:17+5:30
चिपळूण नगर परिषदेने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवण्याची मोहीम गुरुवारी पुन्हा एकदा वेगाने सुरु केली.
चिपळूण - चिपळूण नगर परिषदेने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवण्याची मोहीम गुरुवारी पुन्हा एकदा वेगाने सुरु केली. चिपळूण बाजारपेठ, शिवाजी चौक, भोगाळे ते पॉवर हाऊस दरम्यानची अतिक्रमणे पालिकेने हटवल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. उद्या शुक्रवारीही ही मोहीम सुरु राहणार आहे.
सकाळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, मुख्याधिकारी पंकज पाटील, नगर अभियंता सुहास कांबळे, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, अतिक्रमण विरोधी पथकाचे रमेश कोरवी, मंगेश पेढांबकर, प्रसाद देवरुखकर, अनंत हळदे, वैभव निवाते यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरु झाली. चिपळूण बाजारपेठ, शिवाजी चौक, भोगाळे ते पॉवर हाऊस दरम्यान ही मोहीम सुरु होती. मोहीम काळात अनेक व्यापाºयांनी व व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे स्वत:हून काढून टाकली. ज्यांनी नगर परिषदेने सांगूनही बांधकामे काढली नाहीत, अशा बांधकामांवर हातोडा फिरवण्यात आला. बुलडोझरच्या सहाय्याने ही बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली व त्यातील साहित्य ट्रॅक्टरमध्ये भरुन नेण्यात आले. ही कारवाई सुरु असताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, कोणीही या कारवाईला विरोध केला नाही.
चिपळूण शहराच्या वैभवात भर पडावी व हे शहर स्वच्छ, सुंदर दिसावे यासाठी नगर परिषदेने ही कारवाई सुुरु केली आहे. कारवाई सुरु होण्यापूर्वी नगराध्यक्षा खेराडे यांनी बुधवारी सायंकाळी संबंधित व्यापारी व व्यावसायिकांची बैठक घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी ही मोहीम का राबवावी लागत आहे, त्याचा उहापोह नगराध्यक्षांनी केला. त्यानुसार गुरुवारी ही कारवाई सुरु झाली असून, ती उद्या शुक्रवारीही सुरु राहणार आहे. दरम्यान चिपळूण पोलीस ठाण्यात ही अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पोलीस संरक्षण मिळावे म्हणून नगर परिषदेने दोन पत्र दिली होती. तरीही पोलिसांकडून संरक्षण मिळाले नाही. शहरात दररोज वाहतूक पोलीस कार्यरत असतात. मात्र, आज कारवाईच्या काळात वाहतूक पोलीस रस्त्यावर नसल्याने नगर परिषद प्रशासनाने नाराजी व्यक्त केली. हे जाणूनबुजून केले जात असल्याचा ठपका ठेवत नगराध्यक्षा खेराडे यांनी आपण याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. कारवाईचा फार्स करुन काही दिवस रस्ते मोकळे ठेवले जातात. परंतु, पुन्हा या रस्त्यांवर अतिक्रमणे वाढत जातात. त्यामुळे पालिकेची ही कारवाई ठोस असावी, अशी अपेक्षाही काही नागरिकांनी व्यक्त केली.
दोनवेळा मागणी करूनही बंदोबस्त नाही
चिपळूण शहरात नगर परिषदेतर्फे अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम सुरु असताना दोनवेळा मागणी करुनही पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांची शिरगाव पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतली व त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर प्रणय अशोक यांनी तातडीने बंदोबस्त देण्याचे आदेश पोलीस निरीक्षक जाधव यांना दिले.
तू तू मै मै
नगर परिषदेची अतिक्रमण हटाव कारवाई सायंकाळी पानगल्ली परिसरात सुरु होती. यावेळी काही दुकानांचे शटर तोडताना ते भिंतीसह निघाल्याने व्यापारी व नगर परिषदेचे कर्मचारी यांच्यामध्ये ‘तू तू मैं मैं’ झाली. या शाब्दिक बाचाबाचीनंतर घटनास्थळी पोलीसही दाखल झाले होते. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नगरपालिका प्रशासन व व्यापारी यांच्यामध्ये सायंकाळी उशिरापर्यंत समन्वयासाठी चर्चा सुरु होती. यामुळे काहीकाळ पानगल्लीतील वातावरण तणावपूर्ण बनले होते.