कृषी विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले : दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:50 AM2017-11-28T11:50:07+5:302017-11-28T11:52:01+5:30
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आजपर्यं अनेक संशोधक या देशाला दिले आहेत. विश्वातील इतर विद्यापीठानेही यासंशोधनाला मान्यता दिल्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे, असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), वित्त नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आजपर्यं अनेक संशोधक या देशाला दिले आहेत. विविध नारळाच्या जाती, भाताच्या जाती, आंब्याच्या जाती तसेच विविध फळांच्या जातीचे संशोधन करुन नवनवीन फळांच्या जाती निर्माण करण्याचे श्रेय डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला जाते. या सर्व फळांच्या जातींचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील संशोधक विद्यापीठात येत आहेत. विश्वातील इतर विद्यापीठानेही यासंशोधनाला मान्यता दिल्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे, असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), वित्त नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
२१ वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा २७ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०१७ पर्यंत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे आयोजित केल्या आहेत. या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केसरकर बोलत होते. युवावर्गामध्ये खेळभावना जागृत होण्याकरिता क्रीडा स्पर्धांचे आयोजन उपयुक्त ठरेल.
दरवर्षी या स्पर्धा आयोजित केल्याने राज्यातील होतकरु खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याकरिता संधी प्राप्त होते. शासनाने घेतलेल्या निर्णया अनुसार सर्व विभागात खेळाडूंना पाच टक्के विविध पदांच्या जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, असेही केसरकर म्हणाले.
कृषी व फलोत्पादन पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, राज्याचे माजी राज्यपाल व विद्यापीठाचे तत्कालीन कुलपती पी.सी. अलेक्झांडर यांनी एड्स रोगाच्या प्रतिकार व जनजागृतीसाठी क्रीडा महोत्सवाची संकल्पना मांडली होती.
या क्रीडा महोत्सवाने गेल्या २० वषार्पासून महाविद्यालयीन युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. या स्पर्धांच्या आयोजनाच्या निमित्ताने युवकांमध्ये एड्स या रोगाविषयी जनजागृती करण्याची उत्तम संधी विद्यापीठाला मिळाली आहे, असेही खोत म्हणाले.
या कार्यक्रमाला आमदार संजय कदम, डॉ. बाळासाहेबत सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु तपस भट्टाचार्य, राज्यपाल यांचे प्रतिनिधी दीपक माने, डॉ. सुभाष ढाणे, विनोद गायकवाड, दापोलीच्या नगराध्यक्ष उल्का जाधव, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिनव गोयल, क्रीडा महोत्सव संयोजक डॉ. सुभाष चव्हाण, प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.