देवरूख नगरपंचायतीमध्ये फुलले भाजपाचे कमळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 02:13 PM2018-04-12T14:13:31+5:302018-04-12T14:13:31+5:30
देवरूख नगर पंचायत निवडणुकीत अनपेक्षितरित्या भाजपने बाजी मारली असून, नगराध्यक्ष पदासह सर्वाधिक जागाही जिंकल्या आहेत.
रत्नागिरी - देवरूख नगर पंचायत निवडणुकीत अनपेक्षितरित्या भाजपने बाजी मारली असून, नगराध्यक्ष पदासह सर्वाधिक जागाही जिंकल्या आहेत. देवरूखमध्ये नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला पराभूत करून भाजपच्या मृणाल शेट्ये विजयी झाल्या.
प्रत्येकी १७ जागांसाठी देवरूख आणि गुहागर नगर पंचायतीसाठी बुधवारी मतदान झाले होते. आज गुरूवारी मतमोजणी झाली. देवरूखमध्ये नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला पराभूत करून भाजपच्या मृणाल शेट्ये विजयी झाल्या. १७पैकी आठ जागा भाजप, रिपब्लिन पार्टी आॅफ इंडिया आणि मनसे आघाडीने जिंकल्या आहेत. त्यातील सात जागा भाजपने तर एक जागा मनसेने जिंकली आहे. शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन तर काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. एक अपक्ष उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आला आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक जागा भाजपच्या आहेत. भाजपला विरोध करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले तरीही त्यांना एक मत कमी पडणार आहे. उपनगराध्यक्ष, विषय समिती निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवाराचे मत ज्यांच्या बाजूला झुकेल त्यांनाच ही पदे मिळतील.
दुसरीकडे गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्यासह सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र शहर विकास आघाडी आणि शिवसेनेने हात मिळवणी केल्याने राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला. गतवेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला फक्त एकच जागा जिंकता आली. शिवसेनेचाही एकच उमेदवार निवडून आला असला तरी शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या शहर विकास आघाडीचे ९ उमेदवार निवडून आले आहेत. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे राजेश बेंडल हे शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. येथे भाजपला विजयाची मोठी आशा होती. मात्र भाजपला सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे.
गुहागर नगर पंचायतीत शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह पंचायतीवर सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला १७पैकी केवळ एकच जागा जिंकता आली असल्याने हा माजी मंत्री आणि आमदार भास्कर जाधव यांना जोरदार धक्का मानला जात आहे. रत्नागिरीत एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपली जागा राखली आहे.