मिरकरवाडा टप्पा दोनला लागणार ब्रेक
By admin | Published: October 31, 2014 12:27 AM2014-10-31T00:27:15+5:302014-10-31T00:30:16+5:30
अनधिकृ त झोपड्यांचा प्रश्न : जीवन प्राधिकरणाच्या जागेला पुन्हा झोपड्यांचा विळखा
रत्नागिरी : मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याला पुन्हा अनधिकृत झोपड्यांमुळे ब्रेक लागणार आहे. जीवन प्राधिकरणाच्या जागेला पुन्हा एकदा अनधिकृ त झोपड्यांचा विळखा पडला आहे. त्यामुळे दुसरा टप्पा रखडण्याची शक्यता असल्याने प्राधिकरणाने पंधरा दिवसात ही जागा खाली करण्याची नोटीस मच्छिमारांना दिली आहे. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही.
मिरकरवाडा बंदराच्या अकरा हेक्टर जागेवर ७४ कोटी रुपये खर्चून हे बंदर विकसीत केले जाणार आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ कोस्टल इंजिनिअरिंग फॉर फिशरीज या संस्थेने तयार केलेल्या सुधारित अहवालानुसार टप्पा क्र. २चे काम हाती घेण्यात येणार आहे. या ठिकाणी ३०० ट्रॉलर्स व २०० पर्ससीन नौका अशा एकूण ५०० नौका उभ्या राहतील, असे सुसज्ज बंदर येथे उभारण्यात येणार आहे. हे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून, शासनाने पहिल्या टप्प्याकरिता निधीदेखील मंजूर केला आहे. याकरिता बंदराची जागा मोकळी करुन मत्स्य खात्याच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. गतवर्षी मिरकरवाडा बंदरातील अनधिकृ त झोपड्या आणि बांधकामे हटविण्यासाठी प्रशासनाकडून १ जून २०१३ ची मुदत देण्यात आली होती. त्यावेळी असलेल्या १७५ अनधिकृत झोपड्या व बांधकामांपैकी जवळपास ७० टक्के बांधकाम मच्छिमारांनीच हटविले होते. उर्वरित बांधकाम जिल्हा प्रशासनाने हटविले. मात्र, वर्षभरानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी झोपड्यांचा विळखा बसला आहे.
विशेष म्हणजे २००८ पासून या अनधिकृ त झोपट्या हटविण्याचे काम सुरु होते. तत्कालीन प्रांताधिकारी फरोग मुकादम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिसांच्या मदतीने २५० झोपड्या त्यावेळी हटविण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर बंदर विकासाला चालना मिळालेली नाही. पुन्हा एकदा झोपड्यांचे प्रस्थ उभे राहिले.
तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याहस्ते मिरकरवाडा बंदराच्या टप्पा दोनमधील विस्तारित कामांचा शुभारंभ करण्यात आला होता. ज्या ठिकाणी मच्छिमारांना सुविधा देण्यात येणार आहेत, त्याचठिकाणी आताच्या घडीला अडीचशे झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. प्राधिकरणाने याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत. तरीही या झोपड्या हटविण्यात आलेल्या नाहीत.
अनधिकृत झोपड्यांची संख्या वाढल्याने मिरकरवाडा बंदराच्या विकासाला खीळ बसणार आहे. याठिकाणच्या झोपड्या हटविणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. त्यामुळे आता या वारंवार उपस्थित होणाऱ्या प्रश्नाबाबत जीवन प्राधीकरण कोणती भूमिका घेते, याकडे मिरकरवाडा परिसरातील मच्छिमारांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
एकवीस कामे प्रस्तावित
आऊटफिटिंग, नौका दुरुस्ती, लिलावगृह, मच्छिमारांना विश्रांतीसाठी शेड, जाळी विणण्यासाठी शेड, लाटरोधक भिंतीचे काम, अंतर्गत रस्ते, नौका दुरुस्ती सुविधा, रेडिओ संपर्क केंद्र, उपाहारगृह, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, सुरक्षारक्षक चौकी आदी विविध २१ कामे या दुसऱ्या टप्प्यांतर्गत प्रस्तावित करण्यात आली आहेत.