कोकण उद्ध्वस्त करण्याची मुख्यमंत्र्यांनी घेतली सुपारी : अशोक वालम यांचा रत्नागिरीत आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:43 PM2017-12-11T16:43:19+5:302017-12-11T16:50:26+5:30
नाणार परिसरात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प कोकणासाठी विनाशकारी आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पासाठी जमीन मोजणी करण्याचे आदेश दिल्याने त्यांनी कोकण उद्ध्वस्त करण्याची सुपारीच घेतला असल्याचा खळबळजनक आरोप कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी रत्नागिरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
रत्नागिरी : नाणार परिसरात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प कोकणासाठी विनाशकारी आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पासाठी जमीन मोजणी करण्याचे आदेश दिल्याने त्यांनी कोकण उद्ध्वस्त करण्याची सुपारीच घेतला असल्याचा खळबळजनक आरोप कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी रत्नागिरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
नाणार परिसरात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प कोकणासाठी विनाशकारी आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्दच झाला पाहिजे. त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आपला लढा सुरू राहणार आहे. वेळप्रसंगी प्राणांतिक उपोषण आपण करू, असा इशारा कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी परिषदेत दिला.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पासाठी जमीन मोजणी करण्याचे आदेश दिल्याने त्यांनी कोकण उद्ध्वस्त करण्याची सुपारीच घेतला असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात केंद्र आणि राज्य शासनाचा रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला जोरदार विरोध होत असून, आज अशोक वालम यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, या प्रकल्पाचे केवळ फायदेच सांगण्यात येत आहेत. पण, प्रकल्पामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती कोणीच देत नाही. तालुक्याचे आमदार चार महिन्यांनंतर आता या प्रकल्पाला विरोध करत आहेत.
यापूर्वी त्यांना येथील जनतेची काळजी का वाटली नाही? शिवसेना सत्तेत आहे, खासदार, आमदार, पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. एवढेच नव्हे तर उद्योगमंत्री, पर्यावरणमंत्री हेदेखील शिवसेनेचे आहेत. तरीदेखील प्रकल्पासाठीचा अध्यादेश काढण्यात आला. जर विरोधच करायचा होता तर अध्यादेश का काढण्यात आला? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शिवसेना पक्षप्रमुख यांनी मातोश्रीवर आयोजित केलेल्या बैठकीला खासदार, आमदार, पालकमंत्री उपस्थित होते. या बैठकीला प्रकल्पबाधित ग्रामस्थांना बोलावण्यात आले होते. पण, या बैठकीपासून आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी आपली बाजू उचलून धरल्यानंतर आपणास बैठकीला बोलावण्यात आल्याचे वालम यांनी सांगितले.
या बैठकीत येत्या अधिवेशन काळात शिवसेनेचे आमदार, खासदार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करतील आणि हा प्रकल्प येथून हटविण्यात येईल, त्यासाठी मी तुमच्या सोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे वालम यांनी स्पष्ट केले.
अधिवेशन काळात प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्पबाधित गावातील ग्रामस्थ उपोषण करणार असून, या उपोषणाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याचेही त्यांनी सांगितले.
वालम यांनी पुढे सांगितले की, आमचा लढा पक्षविरहीत आहे. प्रकल्प विरोधी भूमिका घेणाºयांचे आम्ही स्वागतच करतो. पण त्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा बॅनर चालणार नाही. जनतेचा या प्रकल्पाला विरोध असतानाही मुख्यमंत्री मात्र प्रकल्प होण्यासाठीच प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत प्रस्तावित जागेतच हा प्रकल्प होणार असल्याचे पुन्हा जाहीर केले आहे. त्यामुळे कोकणावर हा प्रकल्प लादला जात आहे. कोकणातील निसर्ग संपत्ती नष्ट करून हे कोणता विकास करणार आहेत?
मुख्यमंत्र्यांनी कोकणला उद्ध्वस्त करण्याची सुपारीच घेतली आहे. त्यामुळेच ते हा प्रकल्प कोकणाच्या माथी मारत असल्याचे वालम यांनी सांगितले. संपूर्ण कोकणातून हा प्रकल्प हद्दपार झाला पाहिजे, त्यासाठी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.