चिपळूण-कऱ्हाड मार्गामुळे दळणवळण वाढ
By admin | Published: August 15, 2016 12:25 AM2016-08-15T00:25:10+5:302016-08-15T00:25:10+5:30
बाळ माने : चिपळुणात रेल्वे करारनाम्याचे थेट प्रक्षेपण
अडरे : चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकणाशी जोडला जाणार असून, शेतकऱ्यांना याचा विशेष फायदा होणार आहे. व्यापार व दळणवळण वाढीस या रेल्वेमार्गामुळे चालना मिळणार असल्याचा विश्वास भाजपचे माजी आमदार व जिल्हाप्रमुख बाळ माने यांनी व्यक्त केला.
चिपळूण शहरातील बांदल हायस्कूल येथे आज (रविवारी) सकाळी १०.३० वाजता चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गाच्या करारनाम्याचे थेट प्रक्षेपण चिपळुणातील नागरिकांना पाहावयास मिळाले. यावेळी माने बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, भाजपचे तालुकाध्यक्ष रामदास राणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम गोलमडे, माजी आमदार बापू खेडेकर, भाजपच्या शहराध्यक्षा वैशाली निमकर, कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे शौकत मुकादम, रेल्वेचे रिजनल आॅफिसर बाळासाहेब निकम, सुचय रेडीज, आदी उपस्थित होते.
यावेळी माने म्हणाले की, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्ग होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. ते आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरले. या मार्गामुळे कोकणच्या विकासाला चालना मिळणार असून, पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार आहे. माजी आमदार बापू खेडेकर यांनी सांगितले की, कोकणातील शेतकरी हे आपल्या जमिनीला आई मानतात. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना याचा योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. कोकण रेल्वेत मराठी माणूस दिसला पाहिजे, असे माजी आमदार खेडेकर यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाप्रमुख सचिन कदम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात जिल्ह््यात अनेक प्रकल्प पूर्ण होत आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे मंत्री झाल्यानंतर प्रस्तावित चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे आजचा दिवस हा चिपळूण व कोकणच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत रेल्वेचे रिजनल आॅफिसर बाळासाहेब निकम यांनी केले. करारनाम्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी चिपळुणातील बहुसंख्य नागरिकांसह नगरसेवक शशिकांत मोदी, भाजपचे महेश दीक्षित, मधुकर निमकर, तुषार गोखले, नगरसेवक राजू देवळेकर, इनायत मुकादम, भाजप कार्यकर्ते, चिपळूण रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृहावर चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्ग करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर चिपळुणातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. (वार्ताहर)