चिपळूण देशातील सर्वांत जास्त प्रदूषित शहर
By admin | Published: June 21, 2017 01:06 AM2017-06-21T01:06:08+5:302017-06-21T01:06:08+5:30
हुसेन दलवाई : अहवाल येत्या अधिवेशनात राज्यसभेपुढे ठेवणार, पत्रकार परिषदेतील माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : चिपळूण हे देशातील सर्वांत जास्त प्रदूषित शहर असल्याचा गौप्यस्फोट खासदार हुसेन दलवाई यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत करताना याबाबत माझ्याकडे असलेला अहवाल येत्या अधिवेशनात राज्यसभेपुढे ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी पत्रकार परिषदेला माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे, अॅड. जीवन रेळेकर, प्रकाश पाथरे आदी उपस्थित होते. खासदार दलवाई म्हणाले की, २० वर्षांपूर्वी सुरु झालेल्या कारखानदारीच्या माध्यमातून खाडी व नदीपात्रात सोडण्यात आलेल्या रासायनिक दूषित पाण्याने संपूर्ण वाशिष्ठी पात्र प्रदूषित झाले आहे. त्याचे परिणाम परिसरातील नैसर्गिक पाणवठ्यावर झाले आहेत. विहिरी व तळ्यांचे पाणी दूषित झाले आहे. कारखानदारांचे रासायनिक दूषित पाणी शुध्द करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) उभारण्यात आला. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. या प्रकल्पाचे अत्याधुनिकरण व नूतनीकरणाचे काम काँग्रेस सरकारच्या काळात मार्गी लागले. परंतु, या प्रकल्पाच्या उभारणीसह नियोजन व खर्च यात प्रचंड गैरव्यवहार झाल्याने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हा निर्जीव व कमकुवत ठरला आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे याविषयात लक्ष वेधले. मात्र, त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही, हे दुर्दैव आहे. तरीही पुन्हा आपण कदम यांना लेखी पत्र देऊन या प्रक्रिया केंद्राबाबत स्वतंत्र कमिटी नेमून संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
काही कारखान्यांतील त्यांचे स्वत:चे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही संशयास्पद आहेत. असे कारखानदार या प्रकल्पाच्या माध्यमातून रासायनिक प्रकल्पात पूर्ण दूषित पाणी थेट सोडतात. तसेच रासायनिक कचरा छुप्या पद्धतीने खड्डा करुन मातीत टाकतात, तर कशेडी, भोस्ते व अन्य परिसरात निर्मनुष्य ठिकाणी रासायनिक प्रदूषित पाणी व कचरा छुप्या पद्धतीने टाकून देण्याचे काम कंपन्यांकडून सुरु आहे. हे सर्व थांबवण्यासाठी सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प योग्य क्षमतेचा व अत्याधुनिक स्वरुपात कार्यान्वित होणे गरजेचे आहे. भविष्यात कोकणात रासायनिक कारखानदारी येऊ नये. त्या बदल्यात प्रदूषण न करणारे कारखाने उभे राहावेत, अशी मागणी दलवाई यांनी केली. खासदार दलवाई यांनी अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्यावर टीका करताना सांगितले की, सातवेळा शिवसेनेच्या ताकदीवर खासदार होणारे गीते केंद्रीय मंत्री झाले. मात्र, त्यांनी कोकणसाठी काय केले, हा एक संशोधनाचा विषय आहे. ज्या कोकणच्या माध्यमातून शिवसेना नेहमीच सत्तेत येते, त्या कोकणसाठी सेना व त्यांच्या नेत्यांनी आजपर्यंत काय दिले, हे कोकणातील जनतेला सांगावे. कोकणाबाबत भाजपकडून आमची कोणतीही अपेक्षा नाही. कोकणात कारखानदारी वाढली, प्रदूषण वाढले. मात्र, रोजगार वाढला नाही. शेतकरी व मच्छिमार उद्ध्वस्त झाला, ही बाब गंभीर आहे.
चिपळूणच्या वाशिष्ठी नदीचा सर्व दृष्टीने विकास केल्यास पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकते. मात्र, सांडपाण्याने दूषित झालेल्या खाडी व नदीपात्राला प्रदूषणापासून मुक्त करणे गरजेचे आहे. यावेळी दलवाई यांनी लोटे वसाहतीतील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांची नावे जाहीर केली. त्यामध्ये घरडा, रिव्हरसाईड, पुष्कर, ए. बी. मौर्या, एस. आर. ड्रग्ज, सुप्रिया, इंडियन आॅक्सलेट, रॅलिज इंडिया, बहार अॅग्रो, डाऊ, साफयिस्ट, विनती कंपन्यांचा समावेश आहे.