साखरपा धरणातून गळतीमुळे धोका, अधिकाऱ्यांकडून धरणाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 06:01 PM2017-10-30T18:01:13+5:302017-10-30T18:04:51+5:30

Dam of leakage from sugar dam, inspecting dam by officials | साखरपा धरणातून गळतीमुळे धोका, अधिकाऱ्यांकडून धरणाची पाहणी

साखरपा धरणातून गळतीमुळे धोका, अधिकाऱ्यांकडून धरणाची पाहणी

googlenewsNext
ठळक मुद्दे तालुक्यातील कोंडगाव - साखरपा परिसरातील पाचशे घरे भीतीच्या छायेत धरणाला मोठे भगदाड पडून ते फुटण्याची शक्यता

संतोष पोटफोडे

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव - साखरपा धरणाला गळती लागली आहे. धरणाची तातडीने दुरूस्ती न झाल्यास ५०० घरांना धोका आहे. शनिवारी पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली.

तत्कालिन राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या प्रयत्नाने साखरपा येथे धरण बांधण्यात आले. १९९५ साली या धरणाच्या कामाला सुरुवात झाली. २००० साली काम पूर्ण होऊन पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली. तत्कालिन ठेकेदार चन्ना रेड्डी यांनी या धरणाचे काम घेतले होते. प्रथम धरणातून गढूळ पाणी येत असल्याचे निवृत्त प्राथमिक शिक्षक दत्ताराम शिंदे यांच्या निदर्शनास आले.

हे गढूळ पाणी कोठून येते, याची खातरजमा करण्यासाठी दत्ताराम शिंदे यांनी धरण परिसरात पाहणी केली असता, धरणाच्या जॅकवेल शेजारील भिंतीमधून तळाच्या भागातून पाणी येत असल्याचा अंदाज त्यांनी बांधला. शिंदे यांना गळती होत असल्याची पक्की खात्री पटताच त्यांनी त्वरित पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला.

या घटनेचे गांभीर्य ओळखून लांजा पाटबंधारे विभागाचे लवंदे व नलावडे हे घटनास्थळी दाखल झाले. प्रथम १६ तारखेला त्यानंतर १७ व २० आॅक्टोबर रोजी रत्नागिरी विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर २८ आॅक्टोबरला गडगडी प्रकल्पाच्या प्रसादे मॅडम यांनी धरणाची पाहणी केली. या सर्वांनी धरणाला शंभर टक्के धोका असल्याचा निष्कर्ष काढला असून, धरणाची त्वरित दुरुस्ती केली नाही तर धरणाला मोठे भगदाड पडून ते फुटण्याची शक्यता आहे.

धरणाची गळती सुरु असताना याबाबतची कल्पना सरपंचांना व पोलीसपाटीलांना का देण्यात आली नाही, धरणापासून सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर वस्ती असतानाही खबरदारीचा म्हणून त्यांना का कळविण्यात आले नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी धरण पूर्ण भरल्यावर पोलीस पाटलांना कळविले जात असे. मात्र धरण धोकादायक स्थितीत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांना कळविण्याची तसदीदेखील घेतली नाही.

धरणाची देखरेख करण्यासाठी पाडावे नामक व्यक्ती सुरक्षारक्षक म्हणून सुमारे १० वर्षे काम करीत होते. मात्र, सध्या येथे सुरक्षा रक्षकच नाही. धरणाच्या आजूबाजूला जंगल असल्याने गुराखी जनावरांना चरण्यासाठी नेतात. याआधी पाटबंधारे विभागाचे अभियंता लवंदे यांच्याकडून धरणाची देखरेख होत होती. मात्र, त्यांच्या बदलीनंतर धरणाकडे दुर्लक्ष होत गेल्याचे शिंदे यांनी सांगितले.

सुमारे पाचशे घरांना धोका

धरणापासून १०० ते १५० मीटर अंतरावर असणाऱ्या जोयशीवाडी, बौद्धवाडी, बार्इंगवाडी, केतकरआळी, मच्छीमार्के ट परिसरातील घरांना धरणाचा धोका असून, यामध्ये ग्रामदेवता गांगेश्वर मंदिर, जांगळदेव मंदिर, प्राथमिक शाळा, तु. ग. गांधी विद्यालय, सान बार्इंगवाडी येथील प्राथमिक शाळा, अंगणवाडी, मच्छीमार्के ट परिसरातील वस्ती व कार्यालये यांनाही धोका पोहोचू शकतो. एवढे असूनदेखील पोलीसपाटीलांना कल्पना का देण्यात आली नाही, याचीदेखील चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Dam of leakage from sugar dam, inspecting dam by officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.