ओखी वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरांवरील बोटीचे नुकसान, किनारपट्टीवरील घरे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:31 AM2017-12-05T10:31:58+5:302017-12-05T14:02:12+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे - पाजपंढरी - आडे -उटंबर बुरोंडी किनारपट्टीवर रात्री समुद्राला आलेल्या उधाणाने काही ठिकाणी समुद्राचे पाणी घरात घुसले तर काही किना-यावरील मच्छिमारी बोटी, मच्छिमारी सेंटर, बर्फ सेंटरचे नुकसान झालं आहे.
शिवाजी गोरे
दापोली : केंद्रबिंदू गुजरातच्या दिशेने असला तरीही ओखी वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे - पाजपंढरी - आडे -उटंबर बुरोंडी किनारपट्टीवर रात्री समुद्राला आलेल्या उधाणाने काही ठिकाणी समुद्राचे पाणी घरात घुसले तर काही किना-यावरील मच्छिमारी बोटी, मच्छिमारी सेंटर, बर्फ सेंटरचे नुकसान झालं आहे.
राजिवडा - मांडवी किनारपट्टीवर काही ठिकाणी घरात समुद्राचे पाणी घुसले तर काही ठिकाणी धुपप्रतिबंधक बंधारा ओलांडून समुद्राचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पावस - रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड आणि मांडवी किनाऱ्यावर ओखी वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. वादळामुळे समुद्राला उधाण आले असून किनारपट्टीवरील काही भागात समुद्राचे पाणी शिरले आहे. पूर्णगड येथील मजदूर मोहल्ला, शितोचेवाडी, श्रीकृष्णनगर येथे लोकवस्तीत मध्यरात्री पाणी घुसले.
रात्री साडेबाराच्या सुमारास जोराच्या लाट्या उसळल्याने घरात पाणी घुसले. उधाणमुळे किनारपट्टीवरील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. मांडवी येथेही लाटांचे तांडव पाहायला मिळाले. मांडवी, राजिवडा येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरून पाणी रस्त्यावर आले. येथेही काही घरे पाण्याखाली गेली आहेत.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसास सुरवात
दरम्यान वादळामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. किनारपट्टीवर जोराचे वारे वाहात असून पावसास सुरुवात झाली आहे. दापोली तालुक्यात पहाटेपासूनच रिमझिम पाऊस पडत आहे. वातावरणातील बदलामुळे आज कोकणातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आज सकाळपासूनच जोरदार वारा सुरू आहे. समुद्र अजूनही खवळलेलाच आहे. नेहमी पेक्षा लाटांची उंची सुद्धा अधिक आहे. पावसाचे वातावरण असल्यामुळे लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे .
मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या संदेशानुसार महाराष्ट्र व गोवा राज्याच्या समुद्रात ताशी ५०ते ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहू लागले आहेत. समुद्र खवळलेला आहे. मच्छीमारांनी येत्या ४८ तासांत समुद्रात जावू नये, असा इशारा देण्यात आला आहे. जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किना-यावर परत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.