रत्नागिरी जिल्ह्यात वाहतूक कोेंडीमुळे अनेक भक्तगण उशिरापर्यंत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 02:27 PM2018-09-15T14:27:42+5:302018-09-15T14:31:55+5:30
वाहतूक कोेंडीमुळे अनेक भक्तगण सायंकाळी उशिरापर्यंत दाखल होत होते. ढोल - ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३५७ घरगुती, तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. रत्नागिरीत पुढील १२ दिवस आता गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येणार आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणपतीची विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
रत्नागिरी : ढोल - ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३५७ घरगुती, तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. रत्नागिरीत पुढील १२ दिवस आता गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येणार आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणपतीची विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी अवघा भक्तगण उत्साही झाला होता. गेल्या दोन दिवसात मुंबईकरांचेही मोठ्या संख्येने आगमन झाले असून, गेले चार दिवस एस. टी., रेल्वे, खासगी गाड्यातील गर्दी ओसंडून वाहत आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे. चारचाकी खासगी वाहनांनी तसेच दुचाकीनेदेखील मुंबईकर गावी आले आहेत.
गुरुवारी सकाळपासूनच अनेक ठिकाणी मिरवणुकीने गणेशमूर्ती घरोघरी नेण्यात आल्या. लांबच्या ठिकाणी असलेल्या अनेकांनी गणेशमूर्ती आदल्या दिवशीच मिरवणुकीने घरी नेल्या होत्या. मात्र तरीही दुपारपर्यंत गणेशमूर्ती मिरवणुका सुरू होत्या.
गणेश चतुर्थीनिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालयांना एक दिवस सुट्टी असून, खासगी कार्यालयेही सणानिमित्त बंद होती. त्यामुळे सकाळपासून बाजारात शुकशुकाट होता. सायंकाळी बाजारात चिबूड, काकडी, फळे, भाज्या विक्रेत्यांनी गर्दी केली होती.
ऋषी पंचमीचे व्रत अनेक भाविक करीत असतात. यादिवशी केवळ मानवी श्रमाने पिकविलेले धान्य, भाज्यांचा आस्वाद घेतला जातो. त्यामुळे खास ऋषी पंचमीसाठी लागणारे तांदूळ, भाज्या विके्रत्यांनी गर्दी केल्याने बाजारात ग्राहकवर्गाचीही बऱ्यापैकी गर्दी झाली होती.
भक्तगण उशिरापर्यंत प्रवासात
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यात आले असले तरीही काही ठिकाणी महामार्गाची स्थिती नाजूकच आहे. तसेच वाहतूक कोेंडीमुळे अनेक भक्तगण सायंकाळी उशिरापर्यंत दाखल होत होते. त्यामुळे आज गणेश चतुर्थी असतानाही ग्रामीण भागाकडे जाणाºया बसेस मुंबईकरांच्या गर्दीने फुल्ल झाल्या होत्या.