बुलेट ट्रेनमुळे तो करार रद्द झालेला नाही- अनंत गीते यांचे चिपळूण येथे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:16 PM2017-11-27T13:16:11+5:302017-11-27T13:18:20+5:30
अहमदाबाद ते मुंबई या बुलेट ट्रेनमुळे चिपळूण - कऱ्हाड रेल्वे मार्गाचा करार रद्द झालेला नसून, या कामाचे सर्वेक्षण सुरु आहे. हा महत्त्वाकांक्षी करार रद्द झाल्याचे प्रशासनाचे अधिकृत पत्र नाही, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिली. चिपळूण-कऱ्हाड हा रेल्वेमार्ग बुलेट ट्रेनमुळे रद्द झाला आहे, अशी ओरड होत आहे, ती चुकीची आहे.
चिपळूण : अहमदाबाद ते मुंबई या बुलेट ट्रेनमुळे चिपळूण - कऱ्हाड रेल्वे मार्गाचा करार रद्द झालेला नसून, या कामाचे सर्वेक्षण सुरु आहे. हा महत्त्वाकांक्षी करार रद्द झाल्याचे प्रशासनाचे अधिकृत पत्र नाही, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री गीते गुहागर व चिपळूण येथील शिवसेनेच्या कार्यक्रमानिमित्ताने आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, चिपळूण-कऱ्हाड हा रेल्वेमार्ग बुलेट ट्रेनमुळे रद्द झाला आहे, अशी ओरड होत आहे, ती चुकीची आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याची जबाबदारी त्याच ठेकेदारांवर सोपवली आहे.
ठेकेदारांनी योग्य पद्धतीने काम न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु असून, याबाबत निविदा मागविण्यात आल्या आहेत. १० टप्प्यांमध्ये हे काम होणार असून, १४ पुलांचे काम सुरु आहे. डिसेंबर २०१८पर्यंत झारापपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले असेल, असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणामध्ये बाधित झालेल्या भूधारकांना वेगवेगळ्या वित्तीय संस्था, बँक यांच्या सहकार्यातून योग्य तो मोबदला दिला जाईल. निधीची कुठेही कमतरता भासणार नाही. आतापर्यंत ८५ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०१८पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील. गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे रिफायनरी प्रकल्प येत आहे. या प्रकल्पाचे आम्ही स्वागत करत आहोत, असेही ते म्हणाले.