Holi 2018 रत्नागिरी : पालखीविना आडिवरे येथे रंगतो शिमगोत्सव, २ मार्चला होळी उभी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:58 PM2018-02-28T12:58:31+5:302018-02-28T12:58:31+5:30
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला वसलेल्या आडिवरे गावातील वाडापेठ याठिकाणी श्रीदेवी महाकालीचे पुरातन मंदिर आहे. पालखी विरहीत साजरा होणारा असा कोकणातील हा एकमेव शिमगोत्सव आहे. रविवारी रात्री या शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावर्षी रुंढे येथील होळी निश्चित करण्यात आली असून, २ मार्चला होळी उभी होणार आहे.
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला वसलेल्या आडिवरे गावातील वाडापेठ याठिकाणी श्रीदेवी महाकालीचे पुरातन मंदिर आहे. पालखी विरहीत साजरा होणारा असा कोकणातील हा एकमेव शिमगोत्सव आहे. रविवारी रात्री या शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावर्षी रुंढे येथील होळी निश्चित करण्यात आली असून, २ मार्चला होळी उभी होणार आहे.
शिमगोत्सव फाल्गुन शुद्ध दशमीला सुरु होतो आणि धुलिवंदनाला संपतो. या खेळाच्या सुरुवातीला म्हणजे फाल्गुन शुद्ध दशमीला रात्री गावातील व्यवस्थापक व अन्य ग्रामस्थ मंदिरात एकत्र जमतात. यावेळी देवीला कौल लावण्याची प्रथा आहे. हे कौल लावण्याचे काम मंदिरातील देवीची पूजा करणारे गुरव करतात.
देवीचा कौल मिळाल्यावर खऱ्या अर्थाने या खेळाला सुरुवात होते. रविवारी रात्री कौल लागल्यानंतर देवतांवर गुलाल टाकून शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर मंदिराच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या छोट्या मंदिरासमोर जाऊन त्या देवतेला हाक मारण्याची प्रथा आहे. या मंदिराला ह्यचव्हाटाह्ण म्हटले जाते.
रात्री पोफळ खेळवण्यास सुरुवात होते. पाचव्या रात्री म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या पहाटेला होम केला जातो. सहाव्या दिवशी म्हणजेच धुलिवंदनला होळीचा सण साजरा करतात.
होळीसाठी १२ वाड्यांपैकी एक वाडीचे ठिकाण निश्चित केले जाते. १२ वाड्यांतील सर्व ग्रामस्थ मंदिरात एकत्र जमतात. तेथून ढोल-ताशांच्या गजरात व देवीचा अब्दागिर घेऊन स्वारी निघते व निश्चित केलेल्या ठिकाणी पोहोचते. तेथे गेल्यावर होळीसाठी पोफळ निवडली जाते. मग शेट्ये त्याची पाहणी करुन त्यावर गुलाल टाकतात व ती निश्चित करतात.
त्यानंतर तिची पूजा करुन कुणबी समाजातील लोक ती खोदण्यास सुरुवात करतात. पोफळ बाहेर काढल्यावर त्याचा मुदा तासण्याचे काम सुतार समाज करतो. नंतर ही होळी ढोल-ताशांच्या तालावर नाचत ती वाडापेठ येथील महापुरुषाच्या ठिकाणी आणली जाते व तेथून नाचवत मंदिरात आणली जाते.
तेथून ती उभी करावयाची असते, त्याठिकाणी आणली जाते. यावेळी होळीवर देवीचे निशाण लावले जाते. हे निशाण आणण्याचे, सजवण्याचे काम परिट समाज करतो. या उत्सवात सर्व बांधवही सहभागी होतात.
पाच दिवस पोफळी नाचविण्याचा खेळ
कोकणात शिमगोत्सव साजरा करण्याच्या निरनिराळ््या प्रथा अंमलात आहेत. अनेक देवदेवतांच्या पालख्या याकाळात दर्शनासाठी बाहेर पडतात. मात्र, याला अपवाद आडिवरे येथील श्रीदेवी महाकालीची पालखी आहे. शिमगोत्सवात देवीची पालखी बाहेर पडत नाही तर याठिकाणी पाच दिवस पोफळी नाचविण्याचा खेळ होतो.
सगळे खेळे एकत्र
आडिवरे गावातील विविध खेळे १ मार्च रोजी मंदिरात एकत्र येणार आहेत. यावर्षी ड्रॉ पद्धतीने रुंढे, कोंडसर बु., नवेदर, कालिकावाडी, कोंडसर बु. वरचीवाडी, थारळवाडी, भिकारवाडी, राजवाडी, टेंबाचीवाडी, वाडीखुर्द, भराडे, मोगरे, गाऊडवाडी येथील खेळे मंदिरात नृत्य सादर करणार आहेत.