महामार्गाची दुरुस्ती न झाल्यास सत्याग्रह करणार : हुसेन दलवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 10:28 AM2017-10-26T10:28:23+5:302017-10-26T10:48:43+5:30
मुंबई-गोवा महामार्गाची एवढी वाईट परिस्थिती कधीही नव्हती. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी निधी दिला म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ओरडून सांगत आहेत. मात्र सध्या साधी दुरुस्तीही होत नाही. महिनाभरात जर रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर पनवेल ते सावंतवाडीपर्यंत काँग्रेस सत्याग्रह करणार असल्याचा इशारा खासदार हुसेन दलवाई यांनी दिला.
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाची एवढी वाईट परिस्थिती कधीही नव्हती. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी निधी दिला म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ओरडून सांगत आहेत. मात्र सध्या साधी दुरुस्तीही होत नाही. महिनाभरात जर रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर पनवेल ते सावंतवाडीपर्यंत काँग्रेस सत्याग्रह करणार असल्याचा इशारा खासदार हुसेन दलवाई यांनी दिला.
कोकणातील रस्त्यांच्या एकंदर परिस्थितीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खासदार दलवाई चिपळूण येथे आले असता शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री गडकरी यांच्याकडून निधी दिल्याच्या फसव्या घोषणा केल्या जात आहेत. आश्वासनांची खैरात होत आहे. पण निधी नसल्याने चौपदरीकरणातील पुलांची कामे बंद पडली आहेत.
रस्त्याची कंत्राटे ज्या कंपन्याना दिली गेली आहेत त्यांनाच दुरुस्ती करण्यास सांगितली आहेत. मात्र एकाही कंपनीने दुरुस्तीचे काम सुरु केलेले नाही. गणपतीपासून लोकप्रतिनिधी ओरड करीत आहेत. मात्र त्याचा काहीच परिणाम सत्ताधाºयांवर होताना दिसत नाही. जीएसटीमुळे कंत्राटदार कंपनी हैराण आहे.
सिंधुदुर्गमध्ये यापूर्वी रस्त्याची एवढी वाईट परिस्थिती नव्हती. पण तेथीलही रस्ते आता खराब झाले आहेत. महिनाभरात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत महामार्गावरील प्रमुख शहरांमध्ये सत्याग्रह करण्याचा इशारा खासदार दलवाई यांनी दिला आहे. नारायण राणे यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. त्यांच्याशी आपला विचारांचा लढा असल्याने तो विचारानेच लढायला हवा.
सध्या सोशल मिडियावर मोदी विरोधी पोस्ट येत आहेत. त्या काँग्रेसवाल्यानी टाकलेल्या नाहीत तर जनतेमधील उद्रेक समोर येत आहे. नांदेड पालिकेच्या निकालाचा चांगला परिणाम भविष्यात दिसून येईल. गुजरातमध्ये काँग्रेसची स्थिती चांगली आहे. तेथे राहुल गांधींच्या लाखोंच्या सभा होत आहेत. राहूल जिथे जातात तेथे पंतप्रधान मोदी जातात. यावरुन तेथे काँग्रेसची सत्ता येईल असे वाटते असेही खासदार दलवाई यांनी सांगितले.
चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम काँग्रेसमध्ये आल्यास त्यांचे केवळ स्वागत नाही तर हार्दिक स्वागत केले जाईल. त्यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे उघडे आहेत. योग्यवेळी आम्ही त्यांचे स्वागत करु. तूर्त आम्ही त्याबाबत काही बोलणार नाही. त्यांनीच त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे असे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले.