कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, साडेतीन तासांच्या खोळंब्यानंतर पॅसेंजर ट्रेन रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 08:25 AM2018-09-18T08:25:36+5:302018-09-18T09:07:53+5:30
गणेशोत्सवावरून कोकणातून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांचे मंगळवारी हाल झाले आहेत.
रत्नागिरी - गणेशोत्सवावरून कोकणातून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांचे मंगळवारी (18 सप्टेंबर) हाल झाले आहेत. तब्बल साडेतीन तासांच्या खोळंब्यानंतर रत्नागिरी स्थानकातून पॅसेंजर ट्रेन रवाना करण्यात आली आहे. रत्नागिरीवरुन मुंबईसाठी सुटणारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर सिंधुदुर्गमधूनच भरुन आल्याने प्रवासी संतप्त झाले होते. संतप्त प्रवाशांनी गेल्या साडे तीन तासांपासून पॅसेंजर ट्रेन रोखून धरली होती.
पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी रत्नागिरी स्थानकात प्रवाशांची समजूत काढून रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न करत होते. रत्नागिरीतील प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यामध्ये सिंधुदुर्गतूनच प्रवासी बसून आले होते. त्यामुळे त्यांनी खाली उतरावं अशी मागणी प्रवासी करत ट्रेन रोखून धरली होती. गाडी न सोडल्यास प्रवाशांविरोधात कारवाई करण्याचा रत्नागिरी पोलिसांनी इशारा दिला होता. तब्बल साडे तीन तास रेल्वे थांबवून ठेवल्यामुळे कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.