मार्लेश्वर शिखराला यात्रोत्सवाचे वेध!

By admin | Published: December 14, 2014 12:07 AM2014-12-14T00:07:13+5:302014-12-14T00:07:13+5:30

देवाचं लग्न : हजारोंच्या साक्षीने पार पडतो विवाह सोहळा

Marhaileshwar Shikhara yatra! | मार्लेश्वर शिखराला यात्रोत्सवाचे वेध!

मार्लेश्वर शिखराला यात्रोत्सवाचे वेध!

Next

मार्लेश्वर : संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वर तीर्थक्षेत्राला (शिखर) आता वार्षिक यात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. मकरसंक्रांतीच्या या यात्रोत्सवाकडे श्री देव मार्लेश्वरावर अगाध श्रद्धा असणाऱ्या भाविकांचे आतापासूनच लक्ष लागून राहिले आहे. यावर्षी हा वार्षिक यात्रोत्सव दि. १२ ते १८ जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. दि. १५ रोजी श्री देव मार्लेश्वराच्या साखरप्याच्या गिरीजादेवीशी विवाह होणार आहे.
देवरुख शहरापासून अवघ्या १८ कि. मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या कडेकपारीत, सभोवताली उंचच उंच कडे व हिरव्यागार वनराईत निसर्गरम्य ठिकाणी एका गुहेमध्ये स्वयंभू श्री देव मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. देवस्थानच्या समोरच बारमाही वाहणारा धारेश्वर धबधबा आहे. हा धबधबा मार्लेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाच्या मनाला भुरळ घालतो तर गुहेमध्ये सापांचा वावर असतो. परंतु आजपर्यंत भाविकाला सापाकडून इजा झाल्याचे ऐकिवात नाही.
स्वयंभू श्री देव मार्लेश्वर देवस्थान निसर्गरम्य ठिकाणी गुहेमध्ये वसले असल्याने दररोज हजारो भाविक मार्लेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. राज्य शासनाने मार्लेश्वर तिर्थक्षेत्र ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषीत केले आहे. त्यामुळे येथील आल्हाददायक निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठीही हजारो पर्यटक मार्लेश्वर तिर्थक्षेत्री भेट देत असतात. या स्वयंभू मार्लेश्वर देवस्थानची महती सर्वदूर पसरली आहे. त्यामुळे मार्लेश्वराच्या भाविकांमध्ये दरवर्षी वाढ होताना दिसते. मार्लेश्वराचे देवस्थान हे १८ व्या शतकातील असून देवस्थानचे मूळ शंकराचे लिंग देवरुख शहरापासून केवळ ३ कि. मी. अंतरावर असणाऱ्या मुरादपूर गावी होते. मात्र तेथील अत्याचाराला कंटाळून शिवलिंगरुपी सत्पुरुषाने जिथे मनुष्यवस्ती नाही व जिथे कोणताही भ्रष्टाचार नाही अशा शांत ठिकाणी जायचे ठरवले. तेथून श्री देव मार्लेश्वर हे आंगवली मठात आले. त्यानंतर ते सह्याद्रीच्या कपारीत असणाऱ्या एका गुहेत जावून राहिले.
आंगवली मठाला आजही अनन्यसाधारण महत्व आहे. मार्लेश्वराच्या यात्रोत्सवाचा प्रारंभ याच मठातून होत असतो. हा यात्रोत्सव यावर्षी दि. १२ ते १८ जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये दि. १२ रोजी आंगवली मठात मार्लेश्वर देवाचा मांडव घालणे, दि. १३ रोजी आंगवली मठात देवाला हळद लावणे व घाण भरणे, दि. १४ रोजी मठाची यात्रा व रात्री १२ वा. मठातून मार्लेश्वर पालखीचे शिखराकडे प्रस्थान, दि. १५ रोजी श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरीजादेवी यांचा विवाह, दि. १६ रोजी मारळ येथे वार्षिक यात्रा, दि. १७ रोजी आंगवली गावात मार्लेश्वर पालखीचे घरोघरी दर्शन व दि. १८ रोजी घरभरणीने यात्रोत्सवाची उत्साहात सांगता होणार आहे. (वार्ताहर)
 

Web Title: Marhaileshwar Shikhara yatra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.