- दापोली तालुक्यात लोकसहभागातून नळपाणी योजना
By admin | Published: March 7, 2017 05:14 PM2017-03-07T17:14:47+5:302017-03-07T17:14:47+5:30
आंजर्ले ग्रामस्थांचा पुढाकार, एकीचे बळ, पाणी योजनेचे फळ
- दापोली तालुक्यात लोकसहभागातून नळपाणी योजना
आंजर्ले ग्रामस्थांचा पुढाकार, एकीचे बळ, पाणी योजनेचे फळ
दापोली : गावची नळपाणी योजना नादुरूस्त झाली. दुरूस्तीला निधी मिळत नाही. म्हणून रडत बसण्यापेक्षा गावकऱ्यांनीच एकत्र येऊन तब्बल तीन लाख रूपये जमवले आहेत. लोकवर्गणी झाली, आता लोकसहभागातून नवीन नळपाणी योजनाच राबवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे... ही घटना आहे, दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील. गाव करील ते राव काय करील या म्हणीचा प्रत्यय देणारी.
आंजर्ले ग्रामपंचायतीकरिता पाणीपुरवठा करण्यात येणारी नळपाणी योजना कुचकामी ठरल्यानंतर वारंवार पाठपुरावा करुनही नळपाणी योजनेच्या दुरुस्तीकरिता निधी मिळाला नाही. यावर तोडगा म्हणून ग्रामस्थांनी लोकसहभाग व लोकवर्गणीतून आंजर्ले - ताडाचा कोंड पिण्याच्या पाण्याची नवीन पर्यायी योजना ग्रामस्थांनी साकारण्याचे ठरविले आहे. याकरिता ३ लाख लोकवर्गणीसुद्धा जमा केली असल्याचे कृ षी तज्ज्ञ, प्रगतीशील शेतकरी राजेश जैन यांनी सांगितले.
आंजर्ले ग्रामपंचायतीची सुकोंडी - वाघीवणे पाणी योजना कार्यान्वित आहे. मात्र निकृष्ट कामामुळे ही योजना वारंवार बंद पडत असून, ही नळपाणी योजना गेले दोन महिने बंद आहे. या नळपाणी योजनेला पर्यायी नळपाणी योजना म्हणून आंजर्ले खामतळे विहिरीतील पाणी ताडाचे कोंडावरील साठवण टाकीत टाकून गावाला पाणी पुरवठा करणे संदर्भात ग्रामस्थांचे एकमत झाले. शासकीय निधीची वाट न पाहता स्वेच्छेने लोकवर्गणी गोळा करुन नळपाणी योजना राबविण्याचा निर्णय झाला. या पाणीपुरवठ्याकरिता ३ लाख रुपयांची गरज होती. लोकवर्गणीतून ३ लाख रुपये गोळा झाले असून, ग्रामपंचायतीच्या जुन्या योजनेला पर्यायी नळपाणी योजना म्हणून आंजर्ले - ताडाचा कोंड लोकवर्गणीतून नळपाणी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरु असून लवकरच ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे. (प्रतिनिधी)