न पाहिलेली रत्नागिरी पुढे आणुया : राहुल पंडित

By Admin | Published: April 29, 2017 12:51 PM2017-04-29T12:51:40+5:302017-04-29T12:56:26+5:30

स्थानिकांनी विशेष पुढाकार घेण्याची गरज

Rahul Pandit should not be seen before | न पाहिलेली रत्नागिरी पुढे आणुया : राहुल पंडित

न पाहिलेली रत्नागिरी पुढे आणुया : राहुल पंडित

googlenewsNext

लोकमत आॅनलाईन/मनोज मुळ्य्े

रत्नागिरी , दि. २९ : पर्यटन महोत्सव कधी तीन दिवसांचा नसतो. ती अव्याहत प्रक्रिया असते. रत्नागिरीत अशा अनेक जागा आहेत की स्थानिकांनी पुढाकार घेतला तर रत्नागिरीचं नशीब पालटून जाईल. त्याची कुठेतरी सुरूवात व्हायला हवी होती. त्यासाठीच रत्नागिरी नगर परिषदेचा आजपासून सुरू होणारा पर्यटन महोत्सव ही त्याची नांदी आहे. येत्या काही वर्षात हा महोत्सव विक्रमी प्रतिसादाचा झालेला दिसेल, याची मला खात्री आहे. मिरकरवाडा ब्रेक वॉटरवॉल जवळची भगवती गुहा, खूप कमी लोकांना माहिती असलेला रत्नदुर्ग किल्ल्याचा दिंडी दरवाजा, किल्ला परिसरातील सतीचे मंदिर, राजीवड्यातील नौकानयन, हौशींसाठी मासेमारीचा अनुभव अशा अनेक गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतील, असा विश्वास रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी ‘लोकमत’शी ‘थेट संवाद’ साधताना व्यक्त केला.

प्रश्न : रत्नागिरीत २८ एप्रिल ते १ मे या काळात होणाऱ्या पर्यटन महोत्सवाचे नेमके स्वरूप काय आहे?

उत्तर : उत्कृष्ट समुद्रकिनारा लाभलेले रत्नागिरी शहर अजूनही पर्यटनदृष्ट्या विकसित झालेले नाही. पर्यटकाने इथे मुक्काम करावा, यासाठी तसे पर्याय आपण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याकरिता पर्यटकांना आकर्षून घेणाऱ्या ठिकाणांची मुळात आपल्याला माहिती हवी. या महोत्सवातून तोच प्रयत्न केला जाणार आहे. पर्यटकांनी आणि त्याचवेळी रत्नागिरीकरांनीही अशा ठिकाणांची माहिती घ्यावी आणि पुढच्या काळात त्या ठिकाणांकडे स्थानिकांनी पर्यटकांना घेऊन जावे, असे अपेक्षित आहे.

प्रश्न : अशी कोणकोणती ठिकाणे आहेत की रत्नागिरीकरांनाही माहिती नाहीत?

उत्तर : अशी अनेक ठिकाणे आहेत. मिरकरवाडा येथे ब्रेकवॉटर वॉलजवळ एक गुहा आहे. ही अतिप्राचीन आहे. गुहेच्या तोंडाशी जागा कमी आहे. आत गेल्यावर मात्र अप्रतिम वाटते. आतमध्ये थोडे अंतर पाण्यातून जावे लागते. आतमध्ये काळोख आहे. मात्र, पर्यटकांना थरारक अनुभव देणारी ती जागा आहे. जिद्दी माऊंटेनियर्सचे तरूण त्यासाठी खूप पुढाकार घेऊन काम करत आहेत. पर्यटन महोत्सवाच्या तीन दिवसात या गुहेत सर्वांना मोफत प्रवेश दिला जाईल. मात्र, त्यानंतरच्या काळात शुल्क लावून ही गुहा सर्वांना दाखवता येईल.

रत्नदुर्ग किल्ला पाहायला अनेक लोक येतात. पण किल्ल्याचा मुख्य दिंडी दरवाजा अनेकांना माहिती नाही. पेठकिल्ल्याकडून भगवती मंदिरकडे जातानाच हा रत्नदुर्ग किल्ला सुरू होतो. अनेक वर्षे झालेल्या दुर्लक्षामुळे येथे जाण्या-येण्याचा मार्ग बिकट झाला होता. पण रत्नागिरीतील शिव प्रतिष्ठानच्या तरूणांनी खूप मेहेनतीने हा मार्ग जाण्यायेण्यासाठी सुकर केला आहे. या भागातील स्वच्छता मोहिमेत मीही सहभागी झालो होतो. अतिशय उत्कृष्ट असा अनुभव होता तो.

याच भागात एक सतीचे मंदिर आहे. सिंहाचे शरीर, व्याल या प्राण्याचे डोके आणि त्याच्या पायाखाली छोटा हत्ती असे दगडात कोरलेले चित्र आहे. हा प्राचीन ठेवा आहे, तो जपायला हवा आणि पर्यटकांसमोर न्यायला हवा. रत्नागिरीत अशी अजूनही अनेक ठिकाणे आहेत. ती पर्यटकांना दाखवायला हवीत.


प्रश्न : शुल्क लावले तर त्याला प्रतिसाद मिळेल का?
उत्तर : पर्यटन महोत्सवाच्या तीन दिवसात नौकानयन, भगवती गुहेचे दर्शन या गोष्टी मोफतच असतील. पण इतरवेळी त्यावर शुल्क आकारले तर पर्यटक प्रतिसाद देतील, असा विश्वास वाटतो. मी असंख्य ठिकाणी फिरलो आहे. कोठेही नि:शुल्क काहीही नाही. दार्जिलिंगमध्ये ५० फूट उंच असा एक मोठा दगड आहे. त्यावर चढून गेल्यानंतर वरच्या बाजूने आसपासचा खूप मोठा परिसर न्याहाळता येतो. त्यासाठी शुल्क आकारले जाते आणि पर्यटक ते देतात. आपणही बाहेर गेल्यानंतर अनेक ठिकाणी असे शुल्क देतो. त्यामुळे रत्नागिरीत अशी पर्यटनस्थळे सशुल्क असतील तरी पर्यटक प्रतिसाद देतील. त्यातून स्थानिकांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, याची मला खात्री आहे.

प्रश्न : रत्नागिरीत दोन पर्यटन महोत्सव होत आहेत, त्याबाबत काय सांगाल?

उत्तर : दोनच का? आणखी महोत्सव झाले तरी रत्नागिरीचा प्रथम नागरिक म्हणून मी त्यांचे मनापासून स्वागत करेन आणि त्यासाठी मला शक्य असलेली सर्व मदत करेन. कारण अशा महोत्सवांमधून जो फायदा होणार आहे तो रत्नागिरीचा आणि रत्नागिरीकरांचा होईल. कुठल्याही पर्यटन महोत्सवानिमित्त पर्यटक रत्नागिरीत आले तरी मला ते हवेच आहेत. कारण त्यातून इथला हॉटेल व्यवसाय, छोटे-मोठे खाद्यपदार्थ व्यावसायिक, नौकाविहार करणारे, मासळी विक्रेते अशा असंख्य घटकांचा फायदा होणार आहे. त्यामुळे अजूनही कोणी महोत्सव भरवण्यासाठी पुढाकार घेतला तरी मला मनापासून आनंदच वाटेल.

प्रश्न : या महोत्सवातून कुठली दीर्घकालीन गोष्ट अपेक्षित आहे?

उत्तर : खूप आहेत. त्यातही म्यानमार आणि रत्नागिरी यांचे नाते दृढ करण्याला अधिक महत्त्व देण्याचा विचार आहे. ब्रह्मदेशाचा राजा थिबा याचा राजवाडा आणि समाधी रत्नागिरीत आहे. त्याची योग्य देखभाल झाली तर तेथील पर्यटक रत्नागिरीत प्राधान्याने येतील आणि त्याचा खूप मोठा फायदा होईल. मुळात स्थानिकांनी यात पुढाकार घेऊन आपापल्या भागात पर्यटकांना आनंद मिळेल, असे उपक्रम राबवण्यावर भर देणे अपेक्षित आहे. ते साध्य झाले तर रत्नागिरीचा कायापालट होईल.

त्या आरोपांची थोडी गंमतच वाटते

स्थानिकांपेक्षा बाहेरच्या कलाकारांना महत्त्व दिल्याच्या आरोपाबद्दल मला नवल वाटते. या महोत्सवातून रत्नागिरीतील विविध पर्यटनस्थळे पुढे आणण्याचा माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न असतानाही केवळ मनोरंजनाच्या कार्यक्रमाचाच विचार काही लोक करत आहेत. या महोत्सवात मनोरंजनातही रोहित राऊत याच्या कार्यक्रमात वाद्यवृंदासह अनेक गायक कलाकार स्थानिक आहेत. तबलावादन, नमन, जाखडी, कथ्थक, भरतनाट्यम, मिमिक्री असे अनेक कलाप्रकार सादर करणारी मंडळी स्थानिकच आहेत, हे कोणाला माहीत नाही का?

मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी

राजीवडा येथे नौकानयन उपक्रम राबवला जाणार आहे. पण त्याचबरोबर मिरकरवाडा येथेही त्याला संधी आहे. अशी ठिकाणे नियमित पर्यटन स्थळे म्हणून पुढे आली तर तेथे खाद्यपदार्थांचे छोटे-छोटे स्टॉल्सही सातत्याने चालू राहतील. गाईड म्हणून काम करणाऱ्यांना यात मोठी संधी आहे. गिर्यारोहण अथवा थरारक पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्पन्नाची मोठी संधी आहे. एकूणच या महोत्सवानंतर सातत्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. अर्थात त्यासाठी गरजेचे आहे ते स्थानिकांनी इच्छाशक्ती दाखवणे.

Web Title: Rahul Pandit should not be seen before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.