रत्नागिरी : जिवलग मित्रानेच केला घात, अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीपोटी खून ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:38 PM2018-03-23T13:38:33+5:302018-03-23T13:38:33+5:30
माळवी येथील दिनेश शिगवण यांचा खून त्याचा मित्र संतोष निर्मळ यानेच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून एकट्यानेच खून केला की अजून दुसरे कोणी साथीदार आहेत याबाबत पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान याप्रकरणात संतोष याच्यासह दिनेशची दुसरी पत्नी संगीतालाही पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली.
दापोली : माळवी येथील दिनेश शिगवण यांचा खून त्याचा मित्र संतोष निर्मळ यानेच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून एकट्यानेच खून केला की अजून दुसरे कोणी साथीदार आहेत याबाबत पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान याप्रकरणात संतोष याच्यासह दिनेशची दुसरी पत्नी संगीतालाही पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली.
दिनेश शिगवण याचा शुक्रवारी निर्घृणपणे खून झाला असल्याचे उघड झाले होते. दिनेशचा खून कोणी व का केला असावा याबद्दल वेगवेगळ्या चर्चेला पेव फुटले होते. खून करणाऱ्याने अतिशय थंड डोक्याने व पूर्वनियोजित हा खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी अतिशय शिताफीने खुन्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दिनेशची पहिली पत्नी दिव्या आडे येथे कामाला जात होती. मात्र दुसरी पत्नी संगीता घरीच असायची. ती मोलमजुरी करायची. दिनेश व संतोष यांची मैत्री होती. इलेक्ट्रीकचे काम घेतल्यावर दिनेशचा मदतनीस म्हणून संतोष नेहमी त्याच्यासोबत असायचा. संतोषचे दिनेशच्या घरी नेहमी जाणे येणे होते. त्यामुळे संतोषचे दिनेशच्या पत्नीसोबत सूत जुळले होते. त्यामुळे दोघे नेहमी भेटण्याची एकही संधी सोडत नव्हते.
जेवायला बऱ्याचदा संतोष दिनेशच्या घरी असायचा. दिनेशला संतोष व संगीताच्या जवळीकबद्दल माहीत झाले होते. त्याच कारणावरुन त्या दोघांमध्ये खटके उडत होते. शुक्रवारी दिनेश सकाळी नेहमीप्रमाणे गुरं लावायला गेला असता पूर्वनियोजितपणे त्याचा काटा काढण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. पंरतु दिनेशचा मृतदेह ज्याठिकाणी आढळून आला त्या ठिकाणापासून गाव व त्याची गुरं लावण्याची जागा खूप लांब आहे. त्यामुळे या प्रकरणात एकापेक्षा अधिक जणांचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
संतोष निर्मळ याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली असून याप्रकरणी त्याला अटकसुद्धा करण्यात आली आहे. दिनेशची दुसरी पत्नी संगीताला हिलाही अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना ५ दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.