रत्नागिरी : लांजातील कृषिदूत दिलीप नारकर, उद्योजक ते यशस्वी बागायतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 06:14 PM2018-07-24T18:14:18+5:302018-07-24T18:20:24+5:30

वडिलोपार्जित हॉटेल व्यवसाय वृध्दिंगत करताना यशस्वी उद्योजक म्हणून लांजा येथील दिलीप गणपत नारकर यांनी नावलौकिक मिळवला आहे. मात्र, शेतीची आवड असल्याने त्यांनी जमीन खरेदी करून त्यावर बागायती फुलवली आहे.

Ratnagiri: Dilip Narkar, an agriculturist in Lanja, a successful criminal from the entrepreneur | रत्नागिरी : लांजातील कृषिदूत दिलीप नारकर, उद्योजक ते यशस्वी बागायतदार

रत्नागिरी : लांजातील कृषिदूत दिलीप नारकर, उद्योजक ते यशस्वी बागायतदार

googlenewsNext
ठळक मुद्देयशस्वी उद्योजक ते यशस्वी बागायतदार, लांजातील दिलीप नारकर यांना अनेक पुरस्कार हॉटेल व्यवसाय सांभाळताना ह्यत्यांच्याह्णतील जागा झाला संशोधक

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : वडिलोपार्जित हॉटेल व्यवसाय वृध्दिंगत करताना यशस्वी उद्योजक म्हणून लांजा येथील दिलीप गणपत नारकर यांनी नावलौकिक मिळवला आहे. मात्र, शेतीची आवड असल्याने त्यांनी जमीन खरेदी करून त्यावर बागायती फुलवली आहे.

शेतीमध्येदेखील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक दृष्टीकोन बाळगणाऱ्या नारकर यांनी कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पादन मिळवत शासकीय, खासगीस्तरावर विविध बक्षिसे मिळवली आहेत. शासनातर्फे युरोप दौरा करून आलेल्या नारकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिदूत म्हणून गौरविले आहे.

समाजवादी गणपत नारकर यांनी लांजाचे सरपंचपद शिवाय पंचायत समिती सभापतीपदही भूषविले आहे. वडिलांनी साडेचार एकर जागेत फळबाग लागवड केली होती. वडिलोपार्जित हॉटेल व्यवसाय असतानाही वडिलांच्यानंतर दिलीप यांनी हा व्यवसाय विकसित तर केलाच मात्र वडिलांना असलेली शेतीची आवड त्यांनी स्वत: जोपासण्याचे ठरवले.

१९९५मध्ये त्यांनी नऊ एकर जागा मित्राच्या मदतीने खरेदी केली. त्यावेळी कृषी संशोधक डॉ. वैभव शिंदे यांच्याशी त्यांची गाठ पडली. शिंदे यांनी नारकर यांना जमिनीलगत असलेल्या धरणाचा फायदा घ्या, असे सुचवले. त्यानंतर नारकर यांनी स्वत:च्या जमिनीशेजारील आणखी काही जमिनी खरेदी केल्या. त्यानंतर आपल्या एकूण २७ ते २८ एकर क्षेत्रात बागायत फुलवली आहे.

सुरूवातीला संपूर्ण जागेभोवती दिलीप यांनी संरक्षक भिंत उभारली. त्यामध्ये त्यांनी विविध जातींची झाडे लावली आहेत. आंब्याचे तर ५०पेक्षा अधिक प्रकार त्यांच्या बागेत आहेत. चारापिकात मका लागवडीत एन. बी. २१ , गजराज व को - ३ या जातींची लागवड केली आहे. सुरूवातीला रोपे लहान असताना, ते आंतरपिके म्हणून भात, भाजीपाला, कलिंगड यांचे उत्पादन घेत असत.

नारळ बागेमध्ये लाखीबाग संकल्पना राबवून काळीमिरी, दालचिनीची लागवड केली आहे. दालचिनी, नागकेशर, काळीमिरी यांची विक्री नारकर करीत आहेत. काजूबागेत बांधाच्या बाजूने बांबूची लागवड केली आहे. गतवर्षी बांबू तोडीतूनही त्यांना चांगला फायदा मिळाला. नारकर आपल्या बागेतील प्रत्येक उत्पादनाची विक्री ही स्थानिक बाजारपेठेतच करतात. तसेच कोकम, आवळा सरबत तयार करून त्याचीही विक्री करतात. यावर्षी त्यांच्या काजूला १७५ रूपये प्रतिकिलोचा सर्वोच्च दर मिळाला.

शासकीय योजनांबरोबरच नवनवीन तंत्रज्ञानाचाही वापर नारकर आपल्या शेती व बागायतीत करीत आहेत. नांगरणीसाठी पॉवर टिलर, गवत कापणीसाठी ग्रासकटर, फवारणीसाठी स्प्रे पंप, ठिबक/तुषार सिंचन, डिफ्यूजर पध्दतीचा अवलंब त्यांनी केला आहे. शेतातच त्यांनी गांडूळ खत, कंपोस्ट खत हे प्रकल्प उभारले आहेत. शेतीला जोडव्यवसाय म्हणून कुक्कुटपालनही सुरू केले आहे. २०० गावठी (कोंबडी) पालनाद्वारे अंडी, कोंबडीची विक्री ते करतातच शिवाय कोंबडीच्या विष्टेचा वापर खत म्हणून करतात.

सेंद्रीय शेतीवर लक्ष केंद्रित करताना, हे खत स्वत: वापरल्यानंतर उर्वरित खताची ते विक्री करतात. याशिवाय त्यांनी रोपवाटिका व्यवसायही विकसित केला आहे. दरवर्षी २५,००० कलमे बांधून त्यांची विक्री करतात. त्यांनी दुग्धव्यवसायही सुरू केला होता. संकरित जनावरापासून दिवसाला ५० ते ६० लीटर दुधाची विक्री ते करीत असत. मात्र, मजुरांच्या अभावामुळेच त्यांनी सध्या आपला हा दूध व्यवसाय कमी केला आहे. मात्र, तरीही त्यांच्याकडे नियमित २५ ते ३० मजुरांना रोजगार मिळाला आहे. तर ऐन हंगामात त्यांच्याकडे ५० ते ६० मजूर कामाला असतात.हॉटेल व्यवसायाबरोबरच दिलीप यांना बागायतीतूनही चांगले अर्थार्जन होत आहे.
 

 

युरोपिय देशांनी कृषीबरोबरच फळप्रक्रिया उद्योगात प्रगती केली आहे. या देशांमधील शेतकरी शांत व सतत कामात व्यस्त असतात. याठिकाणी कोणी श्रीमंत नाही की गरीबही नाही. पक्रिया उद्योग त्यांनी चांगला विकसित केला आहे. सफरचंदापासून सरबत, स्ट्रॉबेरीपासून बनलेल्या विविध पदार्थाचा आस्वाद जर्मनीत घेता आला. यातूनही शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू शकतात. आपल्याकडे प्रक्रिया उद्योग सक्षम करून त्यांचे जाळे निर्माण होणे गरजेचे आहे.
-दिलीप नारकर, शेतकरी

झिरो बजेट शेती

नारकर यांनी शेतीमध्ये झिरो बजेट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पडीक जमीन शेतीखाली आणून त्यांनी ग्रामस्थांना रोजगार मिळवून दिला आहे. हिरवळीची खते, गांडूळ खत, जिवाणू खत, सेंद्रीय खतांचा वापर करताना वेळोवेळी माती परीक्षणही ते करतात.

फळांवर प्रक्रिया करून त्याद्वारे व्हॅल्युअ‍ॅडिशन माध्यमातून जादा नफा मिळवत आहेत. शेणापासून निर्मित बायोगॅसचा वापर घरातील स्वयंपाकासाठी करून स्लरीपासून चांगल्या प्रतिच्या गांडूळखताची निर्मिती नारकर करीत आहेत. एवढेच नव्हे तर मधुमक्षिका पालन उद्योग करण्यासाठी त्यांनी १६ शेतकऱ्यांना प्रवृत्त केले आहे.

विद्यापीठस्तरावर संशोधन

विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकरी घेत आहेत. शेती विकसित करतानाच उत्पादित वस्तूंसाठी प्रक्रिया उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. काजूगर काढल्यानंतर बोंडापासून सरबत, वाईन किंवा पावडर, जनावरांसाठी खाद्यही तयार केले जाऊ शकते. मात्र, त्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. छोटे ड्रायर तयार करण्याबाबत नारकर यांनी कृषी विद्यापिठाला सूचित केले आहे. घरच्या घरी आंबा, फणस, जांभूळ पोळी, सांडगी मिरची, गरे, आठळापासून पावडर, गºयांची पावडर तयार करता येणार आहे. शेतकरी सक्षम होण्यासाठी विद्यापीठस्तरावरून मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे.

खेडी समृध्द होणे गरजेचे

सध्याचा तरूण दिशाहीन झाला आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, खतव्यवसाय सुरू करता येऊ शकतो. काजू, काळीमिरी, बांबूची शेती नक्कीच फायदेशीर आहे. शेतीबद्दल आत्मियता असेल व व्यावसायिक दृष्टीकोन बाळगून श्रम, चिकाटीतून मिळणारा फायदा भरपूर आहे. वेळी खत, पाणी, कीटकनाशक फवारणी असेल तर काजू पिकातूनही चांगले उत्पन्न मिळते. काजू नाशवंत नसल्यामुळे चांगला दर मिळाला की, त्याची विक्री करणे सुलभ जाते. काजूपिकाचे खोडकिडा किंवा थ्रीप्सपासून संरक्षण करणे गरजेचे आहे.

अद्ययावत यांत्रिकीकरणाचा अभाव

कृषी क्षेत्रातील योगदानामुळेच दिलीप नारकर यांना दहा दिवसांच्या कृषी दौऱ्यानिमित्ताने युरोप दौरा करता आला. हॉलंड, जर्मनी, फ्रान्स, स्पेन या देशांना भेट देण्याची संधी यानिमित्ताने त्यांना प्राप्त झाली. युरोपिय देशांनी कृषीक्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. त्यांनी विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान पाहता, भारत यामध्ये शंभर वर्षे मागे असल्याचे दिसून येते.

Web Title: Ratnagiri: Dilip Narkar, an agriculturist in Lanja, a successful criminal from the entrepreneur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.