रत्नागिरी जिल्हा रुग्णालय पडणार आजारी
By admin | Published: September 9, 2014 11:38 PM2014-09-09T23:38:33+5:302014-09-09T23:46:50+5:30
करार संपुष्टात : अस्थायी तिघे डॉक्टर्स होणार कमी
रत्नागिरी : येत्या आठवडाभरात जिल्हा शासकीय रुग्णालयातील तीन अस्थायी डॉक्टर्सचा करार संपुष्टात येणार असून, त्यामुळे रुग्णालयातील रिक्त पदांची जंत्री आणखी वाढणार आहे. करार संपलेल्या अस्थायी डॉक्टर्सना पुनर्नियुक्ती न देण्याच्या शासन निर्णयामुळे या तीनही डॉक्टर्सना वाढीव मुदत मिळू शकत नाही. त्याचा फटका आता सामान्य रुग्णाला बसणार आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये असलेल्या अस्थायी डॉक्टर्सना पुन्हा वाढीव नियुक्ती न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा फटका रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला बसणार आहे. रुग्णालयातील वातावरणामुळे व राजकीय दबावामुळे जिल्हा रुग्णालयात परजिल्ह्यातील डॉक्टर्स येण्यास अनुत्सूक असतात. त्यातच अस्थायी डॉक्टर्सचा करार न वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे कशी भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा रुग्णालयातून सर्वसामान्यांना अत्यावश्यक सेवा मिळू लागल्या आहेत. सध्या रुग्णालयातील काही पदे रिक्त असतानाही सेवेत असलेले कर्मचारी व अधिकारी आपापल्या परीने रुग्णांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, अस्थायी डॉक्टर्सच्या संपुष्टात येणाऱ्या करारामुळे रुग्णालयाचेच आजारपण वाढण्याची शक्यता आहे.
या रुग्णालयात डॉक्टर्सची ३२ पदे मंजूर असून, सध्या १४ जागा रिक्त आहेत. १८ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फ त रुग्णालयाचा कारभार हाकला जात आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाह्य रुग्ण विभागात सेवेसाठी नेमता येत नसल्याने या विभागातील सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी काही तास बाकी असल्याने या ठिकाणी अन्य डॉक्टर्सची नियुक्ती होणेही अशक्यप्राय बनले आहे.
त्यामुळे पुढील दोन महिनेतरी डॉक्टर्सची नियुक्ती रखडणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभागाचे कामकाज कोलमडणार आहे. (प्रतिनिधी)
तिघा डॉक्टर्सचा करार येणार संपुष्टात.
शासनाच्या निर्णयामुळे करार वाढवता येणार नाही.
रत्नागिरीत येण्यास अनुत्सूक असणाऱ्या डॉक्टर्समुळे रिक्त पदे वाढणार.